RPF असल्याचे सांगत फसवणूक करणारे तिघे अटकेत:हिंगोली पोलिसांनी मध्यप्रदेशातून आवळल्या मुसक्या, अनेक गुन्हे उजेडात येणार
![]()
रेल्वेचे पोलिस अधिकारी असल्याचे सांगत फसवणुक करणाऱ्या मध्यप्रदेशातील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून राज्यभरातील फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रेमकुमार माकोडे यांना एका मोबाईल नंबर वरून फोन आला कळमनुरी शहरातील वार्ड क ०६ मधील खुशबू मोहन पाटील या मुलीचा खंडवा येथे रेल्वे रूळावर कटुन मृत्यू झाला असुन मयताचे नातेवाईक खुप गरीब असुन शव पाठवण्यासाठी आईस बॉक्सची गरज आहे तवढे पैसे त्यांच्याकडे नाहीत तुम्ही ५००० रू ची मदत करा असे सांगत खंडवा पोलीस निरीक्षक मनोजकुमार बोलतो असे सांगीतले. कळमनुरी पोलीसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते वैभव पाटील यांच्याकडून माणुसकीच्या नात्याने पैसे ऑनलाईन पाठविले. त्यानंतर काही वेळाने सपोनि गजानन बोराटे पोस्टे वसमत ग्रामीण यांना सुध्दा कॉल करून वसमत शहरातील खुशबू मोहन पाटील या मुलीचा खंडवा येथे रेल्वे रूळावर कटुन मृत्यू झाला असुन सारखीच घटना सांगीतली व तेथुन सुध्दा काही रोख रक्कम ट्रान्सफर करून घेतली. सदर घटनेबाबत हिंगोली पोलीसांनी अधिक माहिती घेतली असता कोणत्याही शहरामध्ये खुशबू, मोहन पाटील या मुलीचे अपघाती निधन झाल्याचे दिसुन येत नव्हते. तसेच रेल्वे पोलीस निरीक्षक यांचे फोनवरील संभाषन संशयास्पद दिसत होते त्यावरून सायबर काईम मार्फत सदर मोबाईल नंबरची अधिक माहिती घेतली असता सदर प्रकारे फसवणुक करणारी टोळी असुन मध्यप्रदेश मधील सागर जिल्हयातील रहली पोलीस स्टेशन अंतर्गत जुना या गावाची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार गजानन पोकळे, भुजंग कोकरे, साईनाथ कंठे, हरीभाऊ गुंजकर, शिवाजी जालमिरे, ज्ञानेश्वर गोरे, दत्ता नागरे, नरेद्र साळवे, आकाश टापरे, इरफान पठाण, प्रदीप झुंगरे, महिला पोलिस कर्मचारी प्रणिता मोरे यांची दोन पथके मध्यप्रदेशात रवाना झाली. या पथकाने अमित कमलेश कुरमी, विरसींग गोपाल गौंड, भारत दयाराम कुरमी, सिताराम भारत कुरमी (सर्व रा. जुना ता रहली जि सागर राज्य मध्य प्रदेश) यांनी गुन्हा केल्याची माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी अमित, विरसिंग व भारत यांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी राज्यभर अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यातून आता मोठे रॅकेट उघडकीला येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
