राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून बंडखोरी:रवी मोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला; भाजपवर केली सडकून टीका
![]()
महाराष्ट्रात दोन मतदारसंघात पोटनिवडणुका होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघातून दिवंगत नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर राहुरी मतदारसंघात भाजपचे अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बारामती प्रमाणेच राहुरीतही बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू होते. मात्र राहुरीत शिवसेना शिंदे गटाकडूनच बंडखोरी झाल्याचे समोर आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आता राजकीय ट्विस्ट आला असून, शिवसेना शिंदे गटाच्या शेतकरी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी मोरे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना विधानसभेत प्रभावीपणे मांडण्यासाठी खुद्द शेतकऱ्यांनीच आग्रह धरल्यामुळे आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे मोरे यांनी अर्ज भरल्यानंतर स्पष्ट केले. भाजपने आम्हाला विश्वासात घेतले नाही, आम्ही का विचार करावा?- रवी मोरे यावेळी महायुतीच्या युती धर्माबाबत विचारले असता मोरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. राहुरी नगरपरिषद आणि स्थानिक कारखान्याच्या निवडणुकीत भाजपने शिंदे गटाला कधीही विश्वासात घेतले नाही, मग आम्ही तरी त्यांचा विचार का करावा, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे बारामतीमध्ये महायुतीत एकवाक्यता दिसत असली तरी, राहुरीत मात्र शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यानेच बंडखोरीचे निशाण फडकावल्याने महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. प्राजक्त तनपुरे माघार घेण्याची शक्यता तर दुसरीकडे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे यांचे नाव आघाडीवर असताना आणि ठाकरे गटानेही या जागेवर दावा केला असताना, अचानक घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी राजकीय चित्र बदलले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी तनपुरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधून दिल्याचे समजते. या मध्यस्थीनंतर प्राजक्त तनपुरे आता निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार गटाकडून दोघांना फॉर्म शरद पवार गटाने दोन ‘एबी’ फॉर्म पाठवले असून, त्यात प्राजक्त तनपुरे आणि गोविंदराव मोकाटे यांच्या नावाचा समावेश आहे. जर काही कारणास्तव प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, तर पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून गोविंदराव मोकाटे रिंगणात उतरतील, हे आता स्पष्ट झाले आहे. पक्षाकडून लवकरच अधिकृत उमेदवाराची घोषणा केली जाणार असून, या आक्रमक पवित्र्यामुळे राहुरीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असून तिथे आता प्रत्यक्ष लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
