स्मार्ट मीटर लपून, बळजबरीने लावणे बंद न केल्यास आंदोलन:महावितरण कंपनीच्या संचालकांना दिले निवेदन
![]()
प्रतिनिधी | अकोला महावितरण कंपनीने जुने मीटर बसवून न दिल्यास, स्मार्ट (टीओडी) मीटर लपून व बळजबरीने लावणे बंद न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेने (रघुनाथ दादा पाटील प्रणीत) दिला आहे. याबाबत संघटनेचे नेते लक्ष्मीकांत कौठकर यांनी महावितरण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन दिले. तसेच कंपनीच्या प्रकल्प संचालकांचीही भेट घेतली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात प्रचंड वाढ झाली आहे. आम्हाला कोणतीही सूचना न देता सर्व मीटर बदलण्यात आले. नवीन स्मार्ट मीटर काढून जुने मीटर बसवून देण्याची मागणी सर्वस्तरातून होत असल्याचे लक्ष्मीकांत कौठकर यांचे म्हणणे आहे. याबाबत वीज ग्राहकांनी आपल्याकडे तक्रारीही केल्या आहेत. दरम्यान, या मुद्द्यावर त्यांनी कंपनीच्या मुंबई येथील मुख्यालयात संचालकांची भेट घेतली. महावितरण कंपनीने ग्राहकांवर अनेकदा अन्याय केला आहे. याबाबत यापूर्वी रास्ता रोको, धरणे आंदोलन यासारखी आंदोलने केल्याचे कौठकर म्हणाले. त्यामुळे आता स्मार्ट मीटरबाबत महावितरणने ग्राहकहिताचा निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी संघटनेकडून दिला आहे. स्मार्ट मीटरच्या अनुषंगाने महावितरण कंपनीने ग्राहकांचा सन्मान राखत जुने मीटर बसवून द्यावेत; अन्यथा वीज ग्राहक संघटित नसल्याने याचा फायदा घेऊन ग्राहकांचा अपमान महावितरण कंपनी करीत आहे, असे गृहीत धरून परिस्थितीनुसार आवश्यकता असल्यास ग्राहकांचा असंतोष पाहता तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे. या मीटरविरोधात काही संघटना हायकोर्टमध्येही गेलेल्या आहेत. हे मीटर बसवताना ग्राहकांना पूर्वसूचना का दिली नाही, असा प्रश्नही उपस्थित होतो, असे कौठकर यांचे म्हणणे आहे. यापूर्वी झाली होती सभा : स्मार्ट वीज मीटरबाबत काही दिवसांपूर्वी तेल्हारा तालुक्यात सभाही झाल्या होत्या. नवीन मीटर काढून जुने मीटर बसवून देण्याची मागणी ग्राहकांनी केली होती. आम्हाला विश्वासात घेण्यात आले नाही, असा सवाल ग्राहकांनी सभेत केला होता. तसेच नादुरुस्त मीटरच्या जागी स्मार्ट मीटर (प्रीपेड मीटर) बसवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मीटर रीडिंग घेणारे, वीज बिल वाटप करणारे कंत्राटी कामगार यांचे काम जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आमच्यावर येणाऱ्या काळात बेरोजगारीची वेळ येऊ शकते, असे कामगारांचे म्हणणे होते. एकीकडे स्मार्ट मीटरला कामगारांचा विरोध आहे. सामान्य ग्राहकांकडूनही जुन्याच मीटरची मागणी होत आहे, असे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मीटरचा ग्राहकांना अधिकार सन २००३ च्या वीज वितरण कायद्यातील कलम ५५ प्रमाणे मीटर निवडण्याचा अधिकार हा ग्राहकांचा आहे, असे शेतकरी संघटनेच्या कौठकर यांनी निवेदनात नमूद केले. महावितरण कंपनी ग्राहकांच्या अधिकारावर अतिक्रमण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. महावितरणने वीज ग्राहकांना विश्वासात न घेता बळजबरीने स्मार्ट (टीओडी) मीटर बसवले आहेत. मीटरांची किंमत २७ हजार कोटी आहे. पैकी दोन हजार कोटी केंद्र सरकारचे अनुदान आहे. उर्वरित २५ हजार कोटी ग्राहकांकडून वसूल केले जाणार आहेत. प्रत्येकी प्रति ग्राहक ११ हजार ९०० चा बोजा ग्राहकांवर पडणार आहे, असे कौठकर म्हणाले. …तर राज्यव्यापी आंदोलन वीज वितरण कायदा २००३, कलम ५५ नुसार मीटर निवडण्याचा अधिकार आहे. ग्राहकाला पूर्वसूचना न देता बळजबरीने कंपनी वीज ग्राहकांवर अन्याय करीत आहे. लवकरात लवकर जुने मीटर बसवून न दिल्यास, स्मार्ट मीटर लपून व बळजबरीने लावणे बंद न केल्यास विदर्भ, तसेच गरज भासल्यास राज्यव्यापी आंदोलन करणार.- लक्ष्मीकांत कौठकर, विदर्भ अध्यक्ष, शेतकरी संघटना
