अभिनेत्री अक्षया नाईकने कलेतून केली बाप्पाची सेवा!:मालवणीच्या रेड-लाईट एरियामधील मुलांसाठी क्लाऊनिंगचे खास प्रयोग….

[ads_1]


मालिका, ओटीटी , थिएटर अश्या वैविध्यपूर्ण माध्यमातून प्रेक्षकांच मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक! सध्या अक्षया तिच्या सोशल मीडियावर एका विशेष गोष्टीमुळे चर्चेत आहे आणि ते म्हणजे क्लाउनिंग. हा गणेश उत्सव तिच्या कलेने खास झाला पण महत्वाचं म्हणजे तिच्या या कलेतून तिने बाप्पाची सेवा केली आहे. या सगळ्या बद्दल बोलताना अक्षया सांगते …. “क्लाउन्स विदाउट बॉर्डर इंडिया (Clowns Without Borders India ) या आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही प्रामुख्याने सेक्स वर्कर्सची मुलं, रेड-लाईट एरियामध्ये राहणारी मुलं आणि विविध वंचित व distressed communities पर्यंत नाटक आणि क्लाऊनिंग पोहोचवण्याचं काम करतो. त्यांना काही क्षणांसाठी त्यांच्या परिस्थितीपासून दूर नेऊन हसवणं, त्यांच्याशी संवाद साधणं आणि कलेच्या माध्यमातून आनंद देणं, हा आमच्या कामाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यंदाच्या गणेशोत्सवात मालवणी मालाड येथील रेड-लाईट एरियामध्ये काम करणाऱ्या “आस्था परिवार” या NGO बरोबर आम्ही टायअप केला आणि तिथल्या तीन गणपती मंडळांमध्ये जाऊन मुलांसाठी क्लाऊनिंगचे प्रयोग केले. हा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा आणि कायम लक्षात राहणारा होता.” पुढे अक्षया सांगते की, “दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मी अनेक डान्सर्स, गायक आणि कलाकारांना गणपती मंडळांमध्ये जाऊन आपली कला ‘सेवा’ म्हणून सादर करताना पहायचे. तेव्हा मला कायम एक प्रश्न पडायचा—मी कोणताही क्लासिकल डान्स फॉर्म किंवा संगीत शिकले नाहीये, मग माझी कला मी बाप्पाच्या सेवेत कशी आणू शकते? माझ्यासाठी याचं उत्तर यंदा मिळालं. लोकांना हसवणं हीसुद्धा एक खूप मोठी सेवा आहे, असं मला वाटतं. आणि यंदा बाप्पाच्या मंडपात उभं राहून, त्याच्या चरणी माझा क्लाऊनिंगचा पीस सादर करता आला, यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट माझ्यासाठी असूच शकत नाही. माझ्या कलेतून बाप्पाची सेवा करण्याची ही माझी पद्धत होती.” या संपूर्ण अनुभवाचं श्रेय मी आमचे दिग्दर्शक रूपेश टिल्लू आणि माझी सहक्लाऊन अंकिता निकरड यांना देते. या अनुभवातली सर्वात सुंदर गोष्ट मात्र कलेच्या ताकदीची जाणीव करून देणारी होती. ज्या परिसरात आम्ही परफॉर्म करत होतो, तो प्रामुख्याने मुस्लिम समुदायाचा परिसर होता. पण ज्या ठिकाणी आम्ही प्रयोग केला, तिथे एक मशिदीच्या अगदी समोर गणपतीचा मंडप होता. आम्ही ज्या संस्थेबरोबर काम केलं, त्यांच्या काही बुरखा परिधान केलेल्या महिला स्वयंसेवक आणि शिक्षिका मुलांना घेऊन गणपती मंडपात आल्या होत्या. त्या मुलांमध्ये वेगवेगळ्या धर्मांची, पार्श्वभूमीची मुलं होती पण त्या क्षणी सगळे एकत्र होते, अशी माहिती अक्षयाने दिली. अक्षया म्हणते, मला वाटतं अशा गोष्टी फारशा बातम्यांमध्ये येत नाहीत. धर्म किंवा ओळख बाजूला ठेवून लोक फक्त एकत्र येतात, एकमेकांच्या आनंदाचा भाग बनतात, असे अनेक छोटे क्षण आपल्या आजूबाजूला घडत असतात. आणि कदाचित हीच कलेची, नाटकाची आणि परफॉर्मन्सची खरी ताकद आहे लोकांना एकत्र आणण्याची. या प्रयोगांमध्ये आणखी एक आव्हान होतं. अचानक खूप जोरदार पाऊस सुरू झाला. इतका पाऊस होता की आम्हाला एकमेकींचे आवाजही ऐकू येत नव्हते. आमच्याकडे माइकही नव्हता. पण तरीही आम्ही थांबलो नाही. आम्ही मुलांसाठी सलग तीन प्रयोग केले. घरी परतताना शरीर थकलेलं होतं, पण मनात एक वेगळीच ऊर्जा होती. त्या दिवशी पुन्हा एकदा जाणवलं की कला फक्त रंगमंचावर सादर करण्यासाठी नसते; ती एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी, समुदायांना जवळ आणण्यासाठी आणि एखाद्याच्या आयुष्यात काही क्षणांचा आनंद निर्माण करण्यासाठीही असते. आणि यंदाच्या गणेशोत्सवात, माझ्यासाठी हीच बाप्पाच्या चरणी केलेली सर्वात सुंदर सेवा होती, असा अनुभाव अक्षया नाईकने दिली आहे.

[ads_2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *