[ads1]
![]()
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीला आता अधिक वेग येणार आहे. बारावीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 16 मार्चपर्यंत चालेल. त्यानंतर दहावीच्या लेखी परीक्षेला 15 फेब्रुवारीपासून सुरुवात होईल आणि 11 मार्चला परीक्षा संपणार आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेण्यात येणार आहेत. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना शैक्षणिक नियोजन करता यावे, तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, या उद्देशाने मंडळाने परीक्षांच्या संभाव्य तारखा आधीच जाहीर केल्या आहेत. बारावीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारीपासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीची लेखी परीक्षा सोमवार, 8 फेब्रुवारी 2027 रोजी सुरू होणार आहे. या परीक्षेचा शेवटचा दिवस मंगळवार, 16 मार्च 2027 असेल. त्याआधी बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2027 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. दहावीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र अर्थात दहावीची लेखी परीक्षा सोमवार, 15 फेब्रुवारी 2027 रोजी सुरू होणार आहे. ही परीक्षा गुरुवार, 11 मार्च 2027 रोजी संपेल. दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2027 दरम्यान घेण्यात येतील. विषयानुसार सविस्तर वेळापत्रक नंतर मंडळाने सध्या परीक्षांच्या कालावधी आणि संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. प्रत्येक विषयाचा पेपर नेमका कोणत्या दिवशी आणि किती वाजता होणार, याचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अंतिम विषयवार वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर त्याची खात्री करून घ्यावी. विद्यार्थ्यांनी आतापासून अभ्यासाचे नियोजन करावे परीक्षेला आता काही महिनेच शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांनी उपलब्ध वेळेचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. अभ्यासक्रमातील राहिलेले भाग पूर्ण करण्यासोबतच मागील प्रश्नपत्रिका, सराव परीक्षा आणि लेखनाचा नियमित सराव करण्यावर भर देणे आवश्यक आहे. विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी यंदाचे शैक्षणिक वर्ष महत्त्वाचे आहे. दहावीच्या निकालाचा पुढील शिक्षणातील शाखा निवडण्यावर परिणाम होत असल्याने विद्यार्थ्यांकडून या परीक्षेची विशेष तयारी केली जाते. मात्र, गुणांची चिंता करण्यापेक्षा अभ्यासाचे नियोजन करून सातत्याने सराव केल्यास परीक्षेचा ताण कमी करण्यास मदत होऊ शकते. अभ्यासासोबत पुरेशी झोप, योग्य आहार आणि विश्रांती याकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. परीक्षेचा ताण जाणवत असल्यास ध्यान, प्राणायाम किंवा हलका व्यायाम यासारख्या उपायांनी मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करता येईल. वेळापत्रक जाहीर झाल्याने आता विद्यार्थ्यांसमोर परीक्षेपर्यंतचा कालावधी स्पष्ट झाला असून त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करण्याची संधी मिळाली आहे. हेही वाचा… मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार?:हायकोर्टात नवी याचिका, थेट आरोपी करण्याची मागणी मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांना आरोपी करण्यात यावे, अशी मागणी करत आरटीआय कार्यकर्ते आणि भारत अगेंस्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. पार्थ पवार यांच्याविरोधात तक्रारी करूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. सविस्तर वाचा..
[ads2]
दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर:बारावीची परीक्षा 8 फेब्रुवारीपासून, तर दहावीची 15 फेब्रुवारीपासून
















Leave a Reply