हार्ट हॉस्पिटलमधील भोजनालय एफडीएने केले ‘सील’:8 वर्षांपासून बेकायदेशीर, परवाना मिळेपर्यंत सुरु करण्यास मनाई

[ads1]


पीडीएमसीमधील औषधालये सील केल्याची कारवाई नुकतीच झाली असताना, सोमवारी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मार्डी रोडवरील संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलकडे आपला मोर्चा वळवला. गेल्या आठ वर्षांपासून विनापरवाना सुरू असलेले येथील भोजनालय दुपारनंतर सील करण्यात आले. या भोजनालयातूनच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जेवण पुरवले जाते. या कारवाईमुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी भोजनालयाच्या चालक सविता पुरुषोत्तम राऊत (वय ४८) यांना अन्न व औषध प्रशासन विभागाने नोटीस बजावली आहे. त्यांना तात्काळ आवश्यक परवानगीसाठी नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी अदिती देशमुख यांनी रविवारी संबंधित भोजनालयाची तपासणी केली होती. त्यावेळी अन्न व्यवसायासाठी आवश्यक असलेला वैध परवाना त्यांना आढळला नाही. तसेच नोंदणी न घेताच अन्न व्यवसाय सुरू असल्याचेही समोर आले. एफडीएच्या माहितीनुसार, हे भोजनालय जवळपास आठ वर्षांपासून विनापरवानाच सुरू होते. विशेष म्हणजे, हॉस्पिटलच्या विश्वस्तांनीही याकडे दुर्लक्ष केले होते. परवाना न घेता व्यवसाय केल्याने कायद्याच्या कलम २६(२)(iii), कलम ३१(१) तसेच अन्न व्यवसाय परवाना व नोंदणी विनियम, २०११ मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे. परवाना किंवा नोंदणी मंजूर होईपर्यंत संबंधित ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अन्न व्यवसाय करू नये, असेही नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या सूचनांचे उल्लंघन केल्यास अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाच्या कलम ५५ अंतर्गत संबंधितांना कारवाईला सामोरे जावे लागेल. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेच संबंधित नियम व विनियमांनुसार, अन्न पदार्थांचे उत्पादन, विक्री, साठवणूक किंवा वितरण करण्यापूर्वी परवाना अथवा नोंदणी घेणे बंधनकारक आहे. हा नियम हॉटेल, रेस्टॉरंट, मेस तसेच कॅटरिंग व्यवसायिकांना लागू होतो. भोजनालयाला जागा भाड्याने देताना ‘महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५०’ च्या कलम ३६ (१) (बी) अन्वये धर्मादाय आयुक्त किंवा त्यांच्या अखत्यारीतील अधिकाऱ्यांची आधी परवानगी घ्यावी लागते. हार्ट हॉस्पिटलच्या विश्वस्तांनी अशी कोणतीही परवानगी घेतली नाही. सन २०२४-२५ च्या ऑडिट तपासणीत ही बाब समोर आली आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *