[ads1]
![]()
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या १३४ व्या गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, विश्वस्त रोहित लोंढे, पराग वांबुरे, राजेंद्र गावडे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. श्री राधा-कृष्णांप्रती असलेले दिव्य प्रेम आणि भक्तीचा वास असलेल्या प्रेम मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात साकारण्यात आली आहे. भाविकांना प्रेमभावनेत तल्लीन करणारा आध्यात्मिक प्रवास यानिमित्ताने घडवला जात आहे. ही प्रतिकृती सुमारे १०० फूट उंच आहे. प्रतिकृतीच्या रचनेत संगमरवरी वास्तुकलेपासून प्रेरित भव्य दर्शन भाग आहे. उत्तर भारतीय मंदिराच्या पारंपरिक रचनेचे प्रतिबिंब दर्शवणारे कलाकुसर केलेले खांब आणि घुमट आहेत. रासलीला, गोवर्धन लीला, झुला यांसारख्या कृष्णलीला दर्शवणारे शिल्पपटही येथे आहेत. शोभिवंत फुलांची सजावट, पवित्र शुभचिन्हे आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे सायंकाळनंतर हे मंदिर उजळून निघते. प्रारंभी बुधवार चौकात भव्य कमान साकारण्यात आली आहे, त्यावर आकर्षक नक्षीकाम केले आहे. मुख्य प्रतिकृतीच्या दोन्ही बाजूंना असलेल्या रनिंग मांडवावर कृष्णलीलेतील विविध प्रसंग साकारण्यात आले आहेत. मंदिराच्या वर दर्शनी भागात राधा-कृष्णाची भव्य मूर्ती देखील आहे. प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० फूट उंच आहे. यात अनेक भव्य खांब आणि विविध मूर्ती आहेत. गाभारा व मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत आहे, ज्यामुळे भाविकांना लांबून सहजतेने श्रींचे दर्शन घेता येईल. कलादिग्दर्शक नितेश कुमार आणि ग्लिटरी इव्हेंट्स प्रा. लि. यांनी मंदिराच्या प्रतिकृतीचे काम केले आहे.
[ads2]
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रेम मंदिराच्या रोषणाईचे उद्घाटन:श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या गणेशोत्सवासाठी साकारली वृंदावनच्या प्रेम मंदिराची प्रतिकृती
















Leave a Reply