मराठा आरक्षणावर रामदास कदमांचा जरांगेंना सल्ला:‘14 मागण्या मान्य, थोडी सबुरी दाखवा, OBC समाजावर अन्याय नको’

[ads1]


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी 19 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याची घोषणा केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी जरांगे पाटील यांना काही काळ संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. सरकारने जरांगे पाटील यांच्या 14 मागण्या मान्य केल्या असून उर्वरित मागण्यांवरही कार्यवाही सुरू असल्याचा दावा कदम यांनी केला. मराठा समाजाला न्याय मिळायलाच हवा, मात्र आरक्षणाच्या प्रक्रियेत OBC समाजावर अन्याय होऊ नये, ही भूमिका देखील महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मंत्री शंभूराज देसाई यांनी लवकरच जरांगे पाटील यांची भेट घेऊन गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, तर खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याची गरज व्यक्त केली आहे. जरांगे पाटलांनी सबुरीने घ्यावं – रामदास कदम मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचे रामदास कदम यांनी म्हटले. मराठा समाजाला न्याय मिळणे आवश्यक आहे, मात्र त्यासाठी इतर समाजाच्या हक्कांवर परिणाम होऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने जरांगे पाटील यांच्या 14 मागण्या मान्य केल्या आहेत. काही मागण्यांबाबत प्रक्रिया सुरू असून त्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे सध्या सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन जरांगे पाटील यांनी काही काळ संयम ठेवावा, असे आवाहन कदम यांनी केले. 19 सप्टेंबरपासून मुंबईत उपोषणाची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. त्यानंतर आता 19 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे. कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या कारणांचा दाखला देत पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही मुंबईत जाण्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. मोठा जमाव न आणता आपण स्वतः उपोषणाला बसणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांची परवानगी नसताना जरांगे पाटील मुंबईत दाखल होणार का, आंदोलनाची दिशा बदलणार का किंवा न्यायालयाचा मार्ग स्वीकारणार का, याकडे लक्ष लागले आहे. शंभूराज देसाईंचा संवादाचा प्रयत्न दरम्यान, मंत्री शंभूराज देसाई यांनीही जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली. जरांगे पाटील यांच्याकडून मांडण्यात येणाऱ्या काही मुद्द्यांमध्ये पूर्ण माहितीऐवजी अर्धसत्य किंवा गैरसमज असल्याचे देसाई यांनी म्हटले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सरकारची प्रक्रिया सुरू आहे. सातारा गॅझेट तसेच 58 लाख कुणबी नोंदींच्या मुद्द्यावरही कायदेशीर आणि नियमांच्या चौकटीत कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर आपण लवकरच जरांगे पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेणार असून, चर्चेतून त्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. ‘सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा’ : सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याची भूमिका घेतली. आंदोलनातील मागण्या सरकारला मान्य असोत किंवा नसोत, लोकशाही व्यवस्थेत संबंधितांशी चर्चा करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले. सरकारने स्थानिक नेते आणि जबाबदार व्यक्तींना चर्चेसाठी पुढे पाठवावे आणि आंदोलनकर्त्यांची भूमिका समजून घ्यावी, असे सुळे यांनी सांगितले. राज्यात केवळ मराठा आरक्षणाचा प्रश्न नाही, तर OBC समाज, MPSC विद्यार्थी, आदिवासी विद्यार्थी आणि इतर घटकांचेही प्रश्न आहेत. या सर्वांशी संवाद साधून प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठा आरक्षणावर पुन्हा चर्चेची शक्यता एकीकडे जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, तर दुसरीकडे सरकारकडून मागण्यांवर प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. रामदास कदम यांच्याकडून संयमाचे आवाहन, शंभूराज देसाई यांच्याकडून प्रत्यक्ष भेटीची तयारी आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून सरकारला संवादाचा सल्ला, या तिन्ही भूमिकांमुळे आता सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात पुन्हा चर्चा होते का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर रामदास कदमांची नाराजी दरम्यान, रामदास कदम यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरही नाराजी व्यक्त केली. महामार्गाचे काम अपेक्षित वेळेत पूर्ण न झाल्याने आपल्याला दुःख होत असल्याचे त्यांनी म्हटले. या महामार्गाच्या कामासाठी आपण तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशीही मतभेद घेतले होते, असे कदम यांनी सांगितले. मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाकडे लक्ष देऊन कामाला गती द्यावी, अशी मागणीही कदम यांनी केली. पुढील वर्षी गणपती बाप्पा येण्यापूर्वी हा महामार्ग पूर्ण झालेला पाहायला मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हिंदी भाषेसंदर्भातील वक्तव्यावर बोलण्यास कदम यांनी सध्या नकार दिला. अमित शाह यांच्या वक्तव्यामागील नेमकी भूमिका समजून घेतल्यानंतरच यावर प्रतिक्रिया देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा जरांगेंच्या उपोषणाचा 17वा दिवस:मी मुंबईत एकटा येतोय, फडणवीस परवानगी देणार का? जरांगेंचा सवाल, म्हणाले- मराठा आंदोलकांना योग्यवेळी बोलावण्यात येईल मनोज जरांगे पाटील यांनी १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना होण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सकाळी ११ वाजता मुंबईकडे निघणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधवांना सोबत न घेता आपण सुरुवातीला एकट्याने किंवा अत्यंत मोजक्या लोकांसह मुंबईकडे जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मुंबई पोलिसांनी त्यांच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी नाकारली असतानाही १५ सप्टेंबरचा प्रवास नियोजित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सविस्तर वाचा..

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *