[ads1]
नांदेड – एआय गणपतीची स्थापना ही आधुनिक तंत्रज्ञान आणि आपली परंपरा यांचा एक अप्रतिम मेळ आहे. सध्याच्या डिजिटल युगात बाप्पाचे स्वागत करण्यासाठी ही एक अत्यंत नाविन्यपूर्ण आणि आकर्षक संकल्पना आहे. जवळा (दे) या छोट्याशा गावात यंदा गणेशोत्सवाने वेगळंच रूप घेतलं आहे. गावच्या काही बालगोपाळांनी एकत्र येत आपापल्या मोबाईलवर साकारलेला ‘एआय बाल गणेश’ आणि त्यावरचा चमकणारा ‘एआय मखर’ सध्या संपूर्ण गावात चर्चेचा विषय ठरला आहे. दररोज होणारी आरतीही बाल गणेश मंडळाच्या सदस्यांनी एकाच वेळी एकत्र बसून ऑनलाईन पद्धतीने म्हणायची आहे. गणेशोत्सवानिमित्ताने होणारा सर्वच खर्च टाळण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत व कौतुक होत आहे.
या वर्षीच्या गणेशोत्सवानिमित्ताने लोहा तालुक्यातील जवळा दे. गावातील २०-२५ लहान मुलांनी एकत्र येऊन ‘एआय बाल गणेश मंडळा’ची स्थापना केली. त्यांनी तयार केलेली गणेशमूर्ती सर्वसाधारण नसून, तिच्या अंगावर निळ्या आणि सोनेरी रंगाच्या सर्किट डिझाईन आहेत, डोळ्यांत निळी चमक आहे आणि आसन कमळाच्या आकाराचे असून त्यावरही डिजिटल नक्षीकाम आहे. विशेष म्हणजे बाप्पाच्या डोक्यावर पारंपरिक कापडी मखराऐवजी होलोग्राफिक एआय मखर दाखविण्यात आले आहे. या मखरात तरंगती कमळं, निऑन लाईटच्या माळा आणि सर्किट पॅटर्नचा वापर करण्यात आला आहे. हा मखर आपोआप उजळतो, पणत्यांच्या रोषणाईत आणि गावाच्या पार्श्वभूमीवर – बाजूला बसलेल्या म्हशी, जुन्या भिंतीवरील पोस्टर्स आणि झाडांवर लावलेल्या आकाशदिव्यांमध्ये हा बाप्पा एखाद्या भविष्याच्या स्वप्नासारखा वाटतो.
चिमुकल्यांचे कौतुक
आम्ही रोज सकाळी ८ वाजता बाल आरती करतो, संध्याकाळी ७.३० वाजता मुख्य आरती असते,असे मंडळाच्या चिमुकल्या सदस्यांनी सांगितले. मंडळाने ११ दिवसांची कार्यक्रम पत्रिकाही तयार केली असून त्यात एआय कार्यशाळा, रोबोटिक्स प्रदर्शन, पारंपरिक खेळ, आणि एआय आणि आपला संस्कार’ या विषयावर व्याख्यान असे उपक्रम ठेवण्यात आले आहेत. यंदा मंडळासाठी खास एआय बाल गणेश आरती देखील लिहिण्यात आली आहे, जी सुखकर्ता दुखहर्ता च्या चालीवर म्हणता येते. परंपरा जपत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, हे या मुलांनी दाखवून दिलं आहे. या उपक्रमामुळे चिमुकल्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
[ads2]
















Leave a Reply