[ads1]
![]()
ढोल-ताशांचा निनाद, गणरायाची भव्य रांगोळी आणि पारंपरिक वेशभूषेतील कलाकारांच्या उपस्थितीत पुणे फेस्टिव्हलचा ‘मंगलाचरण सोहळा’ शनिवारी अलका चौकात उत्साहात पार पडला. या सोहळ्यात पुणेकरांचा उत्स्फूर्त सहभाग होता. गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच पुण्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन या सोहळ्यातून घडले. आशुतोष देशपांडे यांच्या ‘शिवमुद्रा ढोल पथका’ने स्थिर वादन करून वातावरणात उत्साह निर्माण केला. राष्ट्रीय कला अकादमीचे अमर लांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे फेस्टिव्हलच्या बोधचिन्हासह गणरायाची भव्य रांगोळी साकारली. या कलाकृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते पुण्यातील मानाच्या पाच गणपती मंडळांच्या अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. कसबा गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष निलेश वकील, तांबडी जोगेश्वरी गणपती ट्रस्टचे प्रशांत टिकल, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, तुळशीबाग मंडळाचे विकास पवार आणि केसरीवाडा सार्वजनिक गणपती मंडळाचे अनिल सकपाळ यांना शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. महापौर नागपुरे यांनी सांगितले की, ‘पुणे फेस्टिव्हल’ हा शहराचा प्रमुख सांस्कृतिक उत्सव आहे. सलग ३८ वर्षांची परंपरा जपून हा उत्सव आरोग्यदायी आणि ध्वनी प्रदूषणमुक्त पद्धतीने साजरा करण्यावर भर दिला पाहिजे. खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, गणेशोत्सव हा विद्येचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या उपासनेचा उत्सव आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य असलेले ऐतिहासिक, सामाजिक देखावे आणि वैचारिक देवाण-घेवाण यापुढेही कायम राहावी, असे आवाहन त्यांनी केले. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले की, शुभकार्याची सुरुवात प्रार्थनेने करण्याच्या परंपरेप्रमाणे ३८ व्या पुणे फेस्टिव्हलची सुरुवात मंगलाचरण सोहळ्याने झाली आहे. फेस्टिव्हलचे उद्घाटन १८ सप्टेंबरला होणार आहे. या सोहळ्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पराग काळकर, मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, मोहन टिल्लू आणि नितीन पंडित आदी उपस्थित होते.
[ads2]
पुणे फेस्टिव्हलच्या मंगलाचरण सोहळ्यात मानाच्या गणपती मंडळांचा सन्मान:ढोल-ताशांचा निनाद, भव्य रांगोळी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सांस्कृतिक सोहळा
















Leave a Reply