दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:एकरी 25 हजार वाया; आता पीक मोडायलाही 5 ते 10 हजार रुपये ! शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तडे

[ads1]


भेगाळलेली जमीन… पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे लागलेले डोळे… आणि उभ्या पिकांची करपलेली पाने! यंदाच्या खरीप हंगामाने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घासच हिरावून घेतला आहे. जिल्ह्यात तब्बल सात लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली; मात्र पावसाच्या खंडाने सोयाबीन, मका, तूर यांसह चारा पिकांनाही फटका बसला आहे. एकरी सुमारे २५ हजार रुपये खर्च करून उभे केलेले पीक हातचे गेले; उत्पन्नाची आशा मावळली आणि आता पीक मोडण्यासाठीही पाच ते दहा हजारांचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. खरीपचे हे बिघडलेले गणित आता थेट रब्बीच्या पेरणीवर येऊन ठेपले आहे. यंदा खरीपातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जोरावर रब्बीची पेरणी, बियाणे, खते आणि मशागतीचा खर्च भागविण्याचे शेतकऱ्यांचे नियोजन होते. मात्र खरीपच हातातून गेल्याने रब्बीसाठी पैसा कुठून आणायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच पावसाअभावी विहिरींनी तळ गाठल्याने रब्बीची पिके पाण्यावर आणायची कशी, हा आणखी मोठा पेच शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. अशा स्थितीत झपाट्याने पंचनामे करून भरपाई द्यावी, असा सूर शेतकरी वर्गात आहे. पावसाची तफावत : यंदा १४५.५ मिमीने घट २०२५ : जून १४७ मिमी | जुलै ३१५.१ मिमी | ऑगस्ट १६६ मिमी | सप्टेंबर ९५.४ मिमी, एकूण : ७२३.५ मिमी २०२६ : जून २५४.७ मिमी, जुलै २१४.४ मिमी, ऑगस्ट १०८.२ मिमी, सप्टेंबर (३ सप्टेंबरपर्यंत) ०.७ मिमी,एकूण : ५७८ मिमी एकूण तफावत : २०२५च्या तुलनेत यंदा १४५.५ मिमी पाऊस कमी. महिनानिहाय तफावत : जून +१०७.७ मिमी, जुलै -१००.७ मिमी, ऑगस्ट -५७.८ मिमी, सप्टेंबर -९४.७ मिमी. आमची अवस्था कागदावर टिपून न्या ^ सोयाबिनला एकरी मेहनतीसह २५ हजारांचा खर्च झाला. सुरुवातीच्या पावसात उगवन झाली. पण ऐन शेंगा यायच्या वेळीच पावसाने दडी मारली. आता फुलोरा वाळून गेला, ज्या झाडांना शेंगा होत्या, त्यात दाणे भरायआधीच ते पिवळे पडून करपून गेलंय. आता उपटायला पैसे कुठून आणायचे. सरकारने पंचनामे सुरू करावेत. आमच्या शेतात येऊन, आमची अवस्था एकदा कागदावर टिपून न्यावी अन् भरपाई द्यावी. -सयाजी विधाटे, वांबोरी. २.१ लाख हेक्टरवर सोयाबिन पीक पिवळे कृषी विभागाच्या ३ सप्टेंबरच्या अहवालानुसार, जिल्ह्यात खरीपाची पेरणी ७ लाख १२ हजार ४८७.४३ हेक्टरवर झाली. यामध्ये सर्वाधिक २ लाख १ हजार ८००.७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. सोयाबिनला शेंगा येण्यापूर्वीच ते पीक करपून पिवळे पडले.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *