कोथळीच्या सोमेश्वर मंदिरात 108 दारिद्र्य दुःखहरण स्तोत्रपाठ सोहळा:श्रावणी एकादशी व सोमवारनिमित्त पूजन; शेकडो महिला भाविकांचा सहभाग‎

[ads1]


तालुक्यातील श्रीक्षेत्र कोथळी येथील प्राचीन सोमेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त पवित्र धार्मिक सोहळा उत्साहात पार पडला. श्रावण मास एकादशी व शेवटचा श्रावण सोमवार असा योग साधून याठिकाणी १०८ दारिद्र्य दुःख हरण स्तोत्र पठणाची सामूहिक आवर्तन सभा आयोजित केली होती. सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत पार पडलेल्या या सोहळ्यात संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला होता. संदीप महाराज खामनिकर आणि संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज यांच्या नेतृत्वाखाली उपस्थितांनी मंत्रोच्चारांच्या गजरात स्तोत्राचे सामूहिक पठण केले. कार्यक्रमादरम्यान मंदिरामध्ये रुद्र पठण आणि वेदोक्त मंत्रोपचाराची सेवा हभप संकेत महाराज पाटील यांनी अत्यंत शास्त्रीय पद्धतीने पार पाडली, ज्यामुळे संपूर्ण वातावरणात आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली होती. महाप्रसाद व आरतीने या धार्मिक पर्वाचा समारोप झाला, आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व या धार्मिक सोहळ्याला संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली होती. उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी अशा धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे सांगून या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. उद्धव महाराज जुनारे यांच्यासह सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *