[ads1]
![]()
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील एका चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास पूर्ण केला आहे. आरोपीविरुद्ध 633 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. आळेफाटा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्यात 2 सप्टेंबर 2026 रोजी हे दोषारोपपत्र सादर करण्यात आले. 25 वर्षीय साहिल खैरे याच्या विरोधात हे आरोपपत्र दाखल झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑगस्ट रोजी साडेनऊ वर्षांच्या मुलीला पेरू देण्याचे आमिष दाखवून ऊसाच्या शेतात नेण्यात आले होते. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पोलिसांनी पीडितेच्या ओळखीच्या गावातील 25 वर्षीय आरोपीला अटक केली होती. या प्रकरणात खून, बलात्कार, 12 वर्षांखालील मुलीवरील बलात्कार आणि अपहरणासंबंधी भारतीय न्याय संहितेतील कलमांसह ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी तपासावर देखरेख केली, तर आळेफाटा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विश्वास जाधव यांनी तपासी अधिकारी म्हणून पुरावे गोळा केले. घटनास्थळाचा पंचनामा, वैद्यकीय आणि न्यायवैद्यक अहवाल, साक्षीदारांचे जबाब तसेच अन्य तांत्रिक व परिस्थितीजन्य पुराव्यांचा दोषारोपपत्रात समावेश आहे. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी सांगितले की, तपासादरम्यान काही नवीन साक्षीदार पुढे आले असून त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आरोपीच्या वागणुकीबाबत गावपातळीवर यापूर्वी अनेक तक्रारी किंवा नाराजी होती; मात्र त्याबाबत पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल झाली नव्हती. त्यामुळे या माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करण्यात आली आहे. घटनेनंतर अवघ्या 15 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असले, तरी खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलाची अद्याप नियुक्ती झालेली नाही. गंभीर गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
[ads2]
पिंपळवंडी चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणी 633 पानी दोषारोपपत्र दाखल:नवीन साक्षीदारांचे जबाब नोंदवले; विशेष सरकारी वकिलाची अद्याप नियुक्ती नाही
















Leave a Reply