[ads1]
- Marathi News
- National
- 3 Floors Of 36 year old Building In Delhi Illegal; Basement Collapsed As Soon As Digging, 5 storey Building Near DU Collapses; 5 Dead, 20 Students Feared Trapped
नवी दिल्ली18 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

दिल्लीत कोसळलेली ५ मजली इमारत ३६ वर्षे जुनी होती. तिचे बांधकाम १९९० मध्ये झाले होते. एमसीडीच्या रेकॉर्डमध्ये ती धोकादायक घोषित केलेली नव्हती. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या मते, बेसमेंटमध्ये खोदकाम करताना एक पिलर सरकल्याने इमारत कोसळली. दिल्ली पोलिसांत कार्यरत असलेले स्थानिक रहिवासी राजेन छेत्री यांनी सांगितले की, बेसमेंटमध्ये बांधकाम सुरू होते. तिथे पाणी साचले होते. इमारतीचा पाया कमकुवत होता.
एमसीडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ५५ चौरस यार्डच्या प्लॉटवर बांधलेल्या या इमारतीत तळमजला आणि ४ मजले होते, तर परवानगी केवळ तळमजला आणि पहिल्या मजल्याच्या बांधकामाचीच होती. ३ मजले बेकायदेशीर होते.
दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव म्हणाले की, महापालिकेने एका महिन्यापूर्वी इमारतीला धोकादायक घोषित करून सील केले होते. मात्र, एमसीडी अधिकाऱ्यांच्या मते, सीलिंगचा रेकॉर्ड नाही. बांधकामाची तक्रारही नव्हती.
एमसीडी दक्षिण झोनचे उपायुक्त राकेश कुमार यांनी सांगितले की, दुर्घटनेनंतर दोन हायड्रा मशिन्स, चार जेसीबी, सुमारे सहा पिकअप वाहने आणि ३०-४० कर्मचारी लावले आहेत. परिसरात आधीपासूनच सीलिंगची कारवाई सुरू होती आणि आता पुढे कठोर कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांच्या मते सत्य निकेतनमध्ये असे अनेक बेकायदेशीर पीजी आणि हॉस्टेल बनले आहेत. दिल्ली पोलीस, एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि इतर यंत्रणांची बचाव मोहीम सुरू आहे. एनडीआरएफच्या सुमारे ७० जवानांची दोन पथके आणि श्वान पथक ढिगाऱ्यात दबलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. अडकलेल्या लोकांपर्यंत ऑक्सिजन सिलिंडरही पोहोचवले आहेत. यादरम्यान, मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेशही दिले आहेत.
प्रत्येक विद्यार्थ्याचा जीव मौल्यवान आहे- राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, दिल्लीत इमारत कोसळल्याची बातमी अत्यंत वेदनादायक आणि चिंताजनक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा जीव मौल्यवान आहे आणि त्याचे संरक्षण कोणत्याही परिस्थितीत झाले पाहिजे. बचाव पथकाने शक्य ते सर्व प्रयत्न करून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावे. कुणालाही वाचवण्यात कोणतीही कसर सोडली जाऊ नये.
कॉकरोच जनता पार्टीने या पाच मृत्यूंबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. निमंत्रक अभिजीत दिपके यांनी दिल्लीतील सर्व पीजी हॉस्टेल्सचे सुरक्षा ऑडिट, महापालिकेची चौकशी आणि सुरक्षित वसतिगृहे-वर्ग सुनिश्चित करण्याची मागणी केली.
दुर्घटनेच्या निषेधार्थ एबीव्हीपीच्या १५०-२०० विद्यार्थ्यांनी सिव्हिक सेंटरवर एमसीडीविरोधात निदर्शने केली. इमारतीत जबरदस्तीने घुसण्याच्या प्रयत्नावरून पोलिसांशी झटापट झाली. पोलिसांनी १५ विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.
प्रत्येक खोलीत २-३ विद्यार्थी मालकाला भाडे घेण्याशी मतलब
सत्य निकेतनच्या अरुंद गल्ल्यांमध्ये अनेक होस्टेल, पीजी व खाद्यपदार्थांची दुकाने आहेत. कोसळलेल्या इमारतीत १५ खोल्या होत्या. प्रत्येकीत २-३ विद्यार्थी होते. बहुतांश विद्यार्थी केरळम, हरियाणा व यूपीचे होते. सुट्टीमुळे ते खोल्यांमध्ये होते. दुर्घटनेनंतर अरुंद गल्ल्यांमध्ये बचाव उपकरणे नेण्यातही अडचणी आल्या. ढिगाऱ्याखाली दबलेले विद्यार्थी फोन करून इतरांकडे जीव वाचवण्याची याचना करत राहिले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, इमारत कोसळताच तीव्र हादरा जाणवला. स्थानिक लोक हातांनी आणि उपलब्ध साधनांनी ढिगारा हटवण्याच्या कामाला लागले. २० वर्षांपासून या भागात राहणाऱ्या प्रियंका यांनी सांगितले की, येथे अनेक जुन्या घरांना ५-६ मजली बनवून मुलांचे पीजी बनवण्यात आले आहेत. मालक दुसरीकडेच राहतात. भाडे ऑनलाइन घेतात. इमारतींची देखभाल करत नाहीत. या इमारतीचेही बऱ्याच काळापासून मेंटेनन्स झाले नव्हते. मालक गुरुग्राममध्ये राहतो. एमसीडीने इमारतीजवळचे गर्ल्स पीजी सील केले. ही जीर्ण इमारत पाडली जाईल.
इमारत मालकावर गुन्हा दाखल
इमारतीचा मालक हरिराम व इतरांवर एफआयआर दाखल. अटकेसाठी पोलिस छापे टाकत आहेत. मुख्यमंत्री रेखा गुप्ता घटनास्थळी पोहोचल्या. गृहमंत्री अमित शाह यांनी परिस्थितीची माहिती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले.
ढिगाऱ्यात अजूनही जीवनाची आशा
एआरएसडी कॉलेजचा विद्यार्थी आदित्य ढिगाऱ्यात अडकला. तिथून व्हिडिओ बनवून विद्यार्थी ग्रुपवर पाठवला. तो बिहारचा आहे. व्हिडिओमध्ये तो अरुंद जागेत दबलेला दिसला. चेहऱ्यावर धूळ आहे. बचाव पथक त्याच्यापर्यंत पोहोचले नव्हते.
नवी दिल्ली | दिल्ली युनिव्हर्सिटीच्या साऊथ कॅम्पसजवळील सत्य निकेतनमध्ये रविवारी दुपारी १:३० वाजता ५ मजली इमारत कोसळली. यात मुलांचे पीजी (होस्टेल) होते. ढिगाऱ्यातून १० जणांना बाहेर काढले. यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला. तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. पीजीमध्ये बहुतांश डीयूचे विद्यार्थी होते. २० हून जास्त विद्यार्थी ढिगाऱ्याखाली दबले असल्याची भीती आहे.
[ads2]
















Leave a Reply