वाळूमाफियांवर नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

[ads1]

हायवासह तब्बल २ कोटी १६ लाखांचा मुद्देमाल जप्त; गोदावरी नदीपात्रात अवैध वाळूउपशावर कारवाई


नांदेड (प्रतिनिधी) –  गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळूउपशाला आळा घालण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबविताना पिंपळगाव व भंगी परिसरातील नदीपात्रात छापे टाकून हायवा, फायबर बोटी, तराफे, इंजिन आणि वाळूसह अंदाजे २ कोटी १६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दि. ४ सप्टेंबर रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीची गस्त व अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग सुरू असताना पिंपळगाव ते वाडीपाटी रस्त्यावर अवैध वाळू वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून टाटा कंपनीचा हायवा क्रमांक MH-26-CH-7086 ताब्यात घेतला. या वाहनासह सुमारे ७० ब्रास रेती असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यानंतर पोलिसांनी पिंपळगाव व भंगी येथील गोदावरी नदीपात्रातील वाळूधक्क्यांवर छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच वाळूउपसा करणारे काही इसम नदीच्या पाण्यात उड्या मारून पसार झाले. घटनास्थळावरून मोठ्या फायबर बोटी, लहान फायबर बोटी, इंजिन, तराफे आणि वाळू असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल आढळून आला. काही साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले, तर उर्वरित मुद्देमाल पोलिसांनी पंचांसमक्ष ताब्यात घेतला. या कारवाईत फायबर बोटी, इंजिन, ३५ तराफे आणि रेतीसह एकूण अंदाजे २ कोटी १६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी ज्ञानेश्वर रामदास आव्हाड (वय २२, रा. पेनूर, ता. लोहा) तसेच अर्जुन जगन्नाथ येवले (रेती धक्का मालक/चालक) यांच्यासह अन्य संबंधितांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११२८/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या कारवाईत ज्ञानेश्वर खंडू कोपनर (वय २१, रा. पांघरी, ता. लोहा), पिराजी  तसेच अन्य फरार इसमांविरुद्ध संबंधित कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे व पोलीस अंमलदार जीवन तेलंग, भगवान टिपसरे, भिसे, गफार शेख, कल्याणकर आणि पवार यांच्या पथकाने केली.

अवैध रेती उत्खनन व वाहतुकीमुळे नदीपात्राचे तसेच पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याने अशा कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अवैध वाळूउपसा, साठा किंवा वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस नियंत्रण कक्षास माहिती द्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांनी केले आहे.

 

जर गुन्हा दाखल झाला असेल तर जप्त केलेली वाळू नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात सुरक्षित ठेवायला हवी. नसेल तर त्या ७० ब्रास वाळू साठ्याची निगराणी कोण करणार ? या प्रश्नाचे उत्तर कोणाला विचारावे. किंवा रात्रीतून तो जप्त वाळू साठा तेथून सुरक्षित स्थळी हस्तांतरित केला जाईल काय? असा नवीन प्रश्न या कारवाही नंतर समोर आला आहे.


Post Views: 130






[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *