हिरा जसा चमकतो, तसा राष्ट्रांमधील विश्वासही चिरंतन राहतो’ -बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर

[ads1]

एचआरडी अँटवर्पच्या बीकेसी येथील नवीन कार्यालयाचे पंतप्रधान वेव्हर यांच्या हस्ते उद्घाटन

               मुंबई – हिरा जसा चमकतो, तसा राष्ट्रांमधील विश्वासही चिरंतन राहतो, असे प्रतिपादन बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांनी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एचआरडी अँटवर्पच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी  केले. त्यानंतर त्यांनी हिरा तपासणी व प्रमाणन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली.

            हिऱ्यांच्या प्रमाणपत्रासाठी अग्रगण्य असणाऱ्या एचआरडी अँटवर्प, मुंबई येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांच्या हस्ते झाले. यावेळी एचआरडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल डी वॉख्टर, व्यवस्थापकीय संचालक रमाकांत मिटकर यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. या शिष्टमंडळात रवी भन्साळी, चिराग शाह, मायकेल गिल्हान्ड डी मर्झेम यांचा समावेश होता.

            यावेळी पंतप्रधान वेव्हर यांनी सूक्ष्मदर्शकातून हिऱ्याची पाहणी करून त्याचे कट, रंग, स्वच्छता व कॅरेट तसेच हिऱ्यावरील लेझर मार्किंगबाबत माहिती घेतली. ग्राहकांनी हिरा खरेदी करताना त्याचे प्रमाणपत्र व गुणवत्ता तपासणे महत्वाचे असल्याचे एचआरडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल डी वॉख्टर यांनी सांगितले.

            पंतप्रधान वेव्हर यांनी सुरत, मुंबई, अँटवर्प, दिल्ली, अहमदाबाद, जयपूर व दुबई येथील कार्याचा तसेच इस्तंबूल व रियाध येथील भागीदार प्रयोगशाळांचा आढावा घेतला आणि देशभरातील माहिती जाणून घेतली. पंतप्रधान वेव्हर यांनी एचआरडीच्या प्रयोगशाळेलाही भेट देऊन हिऱ्यांच्या तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली.


Post Views: 7






[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *