मोर्शीत शिक्षण परिवर्तन यात्रेअंतर्गत प्रेरणादायी कार्यशाळा:पंचायत समिती, शिवाजी हायस्कूलचे शिक्षकांसाठी संयुक्त आयोजन
![]()
मोर्शी येथे पंचायत समिती कार्यालय आणि श्री शिवाजी उच्च माध्यमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील शिक्षकांसाठी ‘शिक्षण परिवर्तन यात्रा’ अंतर्गत एका प्रेरणादायी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी उच्च माध्यमिक शाळेच्या रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक दत्तात्रय वारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोर्शी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम, गटशिक्षणाधिकारी डॉ. नितीन उंडे, शाळा निरीक्षक मधुकरराव रोडे, मुख्याध्यापक श्रीकांत देशमुख, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर गायकवाड, संदीप बोबडे, विनोद गाडे, मुरलीधरराव डहाणे, शाळा तपासणी अधिकारी निळकंठ यावले, पर्यवेक्षक विठ्ठल नवरे आणि गजानन चौधरी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दत्तात्रय वारे यांनी जालंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेने आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी प्रगती केली आणि जगातील दहा शाळांमध्ये स्थान कसे मिळवले, तसेच त्यासाठी कोणते बदल केले, याबद्दल शिक्षकांना माहिती दिली. वारे यांनी आपल्या कार्यक्षेत्रात बाबळेवाडी आणि जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळांचा कायापालट करून त्यांना जागतिक दर्जाच्या शाळा बनवले आहे. त्यांच्या मते, जोपर्यंत पालकांचा सहभाग घेतला जात नाही, तोपर्यंत शाळांमध्ये अपेक्षित परिवर्तन घडवून आणणे शक्य होत नाही. या कार्यशाळेत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल शिवाजी उच्च माध्यमिक शाळेचा गौरव करण्यात आला. तसेच, तालुक्यात खाजगी शाळांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या शाळांचा आणि जिल्हा परिषद अंतर्गत प्रथम तीन क्रमांक प्राप्त शाळांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी डॉ. नितीन उंडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रेमा नवरे यांनी केले, तर ज्ञानेश्वर गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. मोर्शी पंचायत समिती अंतर्गत कार्यरत सर्व केंद्रप्रमुख, सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक-शिक्षिका या कार्यक्रमाला उपस्थित होते.
