82 वर्षांनंतर मुंबईत 'प्रगतिशील लेखक संघाचा'चा हुंकार!:11 आणि 12 एप्रिल रोजी राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन
![]()
परळ, मुंबई येथे महात्मा फुले द्विजन्मशताब्दी आणि प्रगतिशील लेखक संघाच्या ९० व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने परळ, मुंबई येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात दि. ११ आणि १२ एप्रिल २०२६ रोजी दोन दिवसांच्या राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी या जागेचे कॉम्रेड सज्जाद जाहीर साहित्यनगरी असे नामकरण करण्यात आले आहे. १९४३ मध्ये कॉम्रेड डांगे यांच्या पुढाकाराने मारवाडी मैदानात ८२ वर्षांपूर्वी स्वातंत्र्यपूर्व कालखंडात प्रगतिशील लेखक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन झाले होते. त्यानंतर राष्ट्रीय स्वरूपाचे हे दुसरे अधिवेशन असणार आहे. प्रगतिशील लेखक संघाची स्थापना ९ एप्रिल १९३६ रोजी झाली. त्याला ९० वर्ष पूर्ण होत आहे. तसेच महान सुधारक, कवी, लेखक नाटककार महात्मा फुले यांचे देखील द्विजन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने ‘सामाजिक न्यायाच्या लढाईत साहित्याचे महत्व’ हा मध्यवर्ती विषय घेऊन मुंशी प्रेमचंद विचार मंचावर हे सेमिनार होणार आहे. ज्यामध्ये देशभरातील एकूण २५ राज्यातील ५० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. हे प्रतिनिधी विविध विद्यापीठे, साहित्य संस्था, जन चळवळी, वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया इत्यादींमध्ये प्रभावीपणे काम करत असून ते आपले शोधनिबंध सादर करतील. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन माजी राज्यसभा अध्यक्ष, तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव कॉ. डी. राजा (केरळ) हे करणार आहेत. तर कार्यक्रमाची अध्यक्षता प्रगतिशील लेखक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पी. लक्ष्मीनारायणा (आंध्र प्रदेश) हे करतील. यावेळी महाराष्ट्र प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष जी. के. ऐनापुरे हे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील. प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. भालचंद्र कानगो, अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. सुखदेवसिंग सिरसा (हरियाणा), महाराष्ट्र राज्यकार्याध्यक्ष, संपादक, प्रकाशक येशू पाटील, लोकवाङ्मय गृह प्रकाशनाचे राजन बावडेकर, राष्ट्रीय सचिव विनीत तिवारी, प्रगतिशील चे नॅशनल कौन्सिल मेंबर डॉ. मनीषा जगताप, महाराष्ट्राचे महासचिव राकेश वानखेडे इत्यादी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ‘महात्मा फुले आणि त्यांचे समकालीन यांचा भारतीय वाङ्मयावरील प्रभाव’ या विषयावर दुसरा परिसंवाद होईल, ज्यामध्ये डॉ. वालेरू शिवप्रसाद (आंध्र प्रदेश) डॉ. एस. के. गंगा (तामिळनाडू) ओदेशी राणी (आंध्र प्रदेश) यांचे अध्यक्षीय मंडळ असेल तर डॉ. डी. आरम (तामिळनाडू) यांचे बीजभाषण होईल. या परिसंवादामध्ये डॉ. वल्लीकाऊ मोहनदास (केरळा) डॉ. प्रज्ञा दया पवार (महाराष्ट्र) कॉ. किशोर मांदळे (महाराष्ट्र), डॉ. सुनिता गुप्ता (बिहार) हे वक्ते सहभागी होणार आहेत. परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रा. प्रसन्नजीत तेलंग करतील तर चारुल जोशी हे मानतील. यानंतर रात्री ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य, नाट्य यांसह सिनेमा दाखविला जाणार आहे. ज्यात विलास कोंडेकर यांच्या ‘झेप’ या मराठी शॉर्ट फिल्मचाही समावेश आहे. दुसऱ्या दिवशी दि. १२ एप्रिल रोजी ३ परिसंवाद आणि एक बहुभाषिक कवी संमेलन होणार आहे. पहिला परिसंवाद सकाळी ९:३० वा. ‘भारतीय साहित्य आणि संस्कृतीवर डाव्या विचारसरणीचा प्रभाव’ या विषयावर होणार आहे, ज्यामध्ये अध्यक्ष मंडळात महादेव टोप्पो (झारखंड), रामसागरसिंह परिहार (गुजरात), डॉ. रविंद्रनाथ राय (बिहार) हे असतील. यावेळी हिंदीतील ख्यातनाम कवी कुमार अंबुज यांचे बीजभाषण होईल. या परिसंवदात वक्ते म्हणून हिंदी कादंबरीकार ररेंद्र (झारखंड), रघुवंश मणी (उत्तरप्रदेश), वंदना चौबे (उत्तर प्रदेश) राजा कांदळकर (महाराष्ट्र) हे सहभागी होणार आहेत. या सत्राचे संचालन प्रगतिशील चे राज्य कार्यवाह डॉ. सुधाकर शेंडगे करतील तर संजय बालाघाटे हे आभार मानतील. सत्र २ हे दुपारी १२ ते २ या वेळेत “PWA @ ९० — प्रवास, योगदान आणि पुढील दिशा’ या विषयावर होणार आहे. यावेळी मुख्य भाषण डॉ. सुखदेवसिंग सिरसा हे करतील. यावेळी अध्यक्ष मंडळात नथमल शर्मा (छत्तीसगड), टी. एस. नटराजन (तेलंगणा), डॉ. पूनम सिंह (बिहार) हे असतील. या परिसंवादात उषा आठले वैरागकर (छत्तीसगड), डॉ. हरविंदर सिंह, (पंजाब), सत्येंद्र कुमार (बिहार), जाहिद खान (मध्य प्रदेश), डॉ. संजय श्रीवास्तव (उत्तर प्रदेश) हे वक्ते म्हणून सहभागी होतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बापू चंदनशिवे तर आभार प्रमोद अहिरे हे व्यक्त करतील. दुपारच्या वेळी महत्वपूर्ण ठराव सभागृहापुढे ठेवण्यात येतील. तिसरा परिसंवाद दु. ३.१५ ते ५ या वेळेत ‘शांतता चळवळीत PWA ची भूमिका’ या विषयावर होणार असून त्याचे मुख्य भाषण सुवरण एस. विर्क (हरियाणा) हे करणार आहेत. तर अध्यक्ष मंडळात फारूक आफ्रिदी (राजस्थान), कुलदीप सिंह दीप (पंजाब) हरिओम राजोरिया (मध्य प्रदेश), रूपालू सुदर्शन (तेलंगाना) हे असतील. या परिसंवादात प्रो. अर्जुमंद आरा (दिल्ली), अविनाश पाटील (महाराष्ट्र), आरती (मध्य प्रदेश), सारिका श्रीवास्तव (उत्तर प्रदेश), शैलेन्द्र (झारखंड) हे वक्ते सहभागी होतील. सूत्रसंचालन राजकुमार कदम करतील सुनील उबाळे हे आभार मानतील. सायंकाळी साडेपाच वाजता बहुभाषिकांचे कवी संमेलन पंजाबी कवी सुरजीत सिंग जज यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. “Words Against War” या संकल्पनेवर आधारित बहुभाषिक कवी संमेलनामध्ये हिंदी, मराठी, इंग्रजी, उर्दू, तामिळ, मल्याळी आणि पंजाबी कवी आपल्या कवितांचे सादरीकरण करतील. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. समाधान इंगळे हे करतील. दोन दिवसाच्या या भरगच्च अशा राष्ट्रीय सेमिनारमध्ये नोंदणी करून सहभागी व्हावे असे आवाहन मुंबई प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष डॉ. प्रज्ञा दया पवार, सचिव डॉ. श्रीधर पवार, चारुल जोशी, यांनी केले आहे.
