अशोक खरात प्रकरणातील महिलांना मानसिक धक्का:मानसोपचार तज्ञांकडून उपचार घेत असल्याची माहिती; व्हिडिओ व्हायरल झाल्याने बदनामीची भीती
![]()
नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. त्यात त्याने अनेक महिलांसोबत लैंगिक संबंध ठेवल्याचे उघड झाल्याने अनेक महिलांची मानसिक स्थिती बिघडल्याचे समोर आले आहे. खरातच्या केबिनमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात अनेक महिलांचे चेहरे देखील दिसून आल्याने त्यांची ओळखही उघड झाली आहे. पोलिसांनी व्हिडिओ पोस्ट न करण्याचा इशारा देऊनही अनेक व्हिडिओ समोर आले. या सगळ्यात आता पीडित महिला मानसिक तणावात असल्याची माहिती आहे. अशोक खरातने ज्या महिलांसोबत लैंगिक संबंध ठेवल्याचे व्हिडिओमधून समोर आले आहे, त्यातील 8-9 महिला मानसोपचार तज्ञांकडून उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलांना आपली बदनामी झाल्याने एकटे पडल्याची भावना भेडसावत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून महिलांना कोणतेही दडपण येऊ नये, तसेच त्यांना पूर्णपणे सुरक्षित ठेवण्याची ग्वाही देण्यात आली आहे. तसेच या महिलांना न्याय मिळवून देण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले आहे. अशोक खरात प्रकरणातील महिलांची ओळख उघड होऊ नये म्हणून या महिलांची चौकशी देखील अज्ञातस्थळी नेऊन केली जात आहे. अशोक खरात आणि महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच सायबर पोलिसांकडून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर सातत्याने नजर ठेवली जात आहे. अशोक खरातचा मुलगाही फरार दरम्यान, अशोक खरात प्रकरणाचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाला मोठा धक्का बसला आहे. अशोक खरातची पत्नी फरार आहेच, त्यात आता त्याचा मुलगाही फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी अशोक खरातच्या मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. चौकशीनंतर त्याला घरी सोडण्यात आले होते. मात्र, आता त्याचा मोबाइल नोट रिचेबल येत असल्याने तोही पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली असून तिचा शोध घेणे सुरू आहे.
