52 लाखांचे चंदन व साहित्य जप्त;नांदेडमध्ये पोलिस उप महानिरीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई
नांदेड (प्रतिनिधी)- पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने अवैध व्यवसायांवर मोठी धडक कारवाई करत तब्बल 52 लाखांचे चंदन व संबंधित साहित्य जप्त केले. नांदेड परिसरातील एका हॉस्पिटलजवळ संशयित वाहनांची तपासणी करताना ही मोठी कारवाई उघडकीस आली.
कशी उघडकीस आली चंदनाची तस्करी?
शनिवार, 5 एप्रिल रोजी डीआयजी यांच्या पथकाने नांदेड रेल्वे स्टेशनजवळील एका हॉस्पिटलसमोर उभ्या असलेल्या संशयित चारचाकी वाहनांची तपासणी सुरू केली. मात्र, वाहनात आढळले लाकडी बॉक्सेस व त्यामध्ये लपवून ठेवलेले चंदनाचे तुकडे! वाहनातील संशयितांकडे कोणतीही परवानगी नसल्याचे स्पष्ट झाल्यावर अधिक चौकशी करण्यात आली. वाहनात 3 फूट, 4 फूट आणि विविध साईजच्या 1,470 किलो वजनाच्या चंदनाची तस्करी होत असल्याचे निष्पन्न झाले.
एकूण जप्तीची किंमत 52 लाख रुपये
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जप्तीमध्ये समाविष्ट
1,470 किलो चंदन : ₹36,75,000/-
वाहन किंमत : ₹15,00,000/-
इतर साहित्य : ₹1,96,000/-
एकूण किंमत – ₹51,96,000/-
तस्करीसाठी वापरलेले वाहन, लाकडी बॉक्सेस, प्लास्टिक पॅकिंग साहित्य आदीही जप्त करण्यात आले आहे.
आरोपी कोण?
शेख रियाज शेख महादेव (वय 33, रा. लातूर)
एक अज्ञात साथीदार
दोघांवर वनअधिनियम कलम 32, 41, 42 व 94 तसेच इतर संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपमहानिरीक्षकांचे अभिनंदन
या कारवाईसाठी डीआयजी शाहाजी उमाप यांनी पथकातील पोलीस उप निरीक्षक पंकज इंगळे,पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे,संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ,कामाजी गवळी यांचे अभिनंदन केले. अवैध वृक्षतोड व तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांना आवाहन – ‘खबर’ हेल्पलाईनचा वापर करा
अवैध व्यवसायांची माहिती त्वरित पोलिसांना कळवावी यासाठी ‘खबर’ नावाचा विशेष मोबाईल क्रमांक 9150100100 यावर संदेश किंवा कॉल करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे
