कौलखेडमध्ये तरुणांचा धुडगूस; तिघांवर चाकूहल्ला:दोघे अल्पवयीन ताब्यात; तिघांचा शोध सुरू, एक जण गंभीर
![]()
शहरातील कौलखेड भागातील एसटी रिजनल वर्कशॉपसमोरील श्रद्धानगर ३ मध्ये जुन्या वादातून दिवसाढवळ्या गुंडगिरीची घटना घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या तरुणांच्या एका टोळक्याने परिसरातील तीन रहिवाशांवर चाकू लोखंडी पाइपने हल्ला केला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील एकाच्या पोटात चाकू भोसकल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्या प्रकरणातील दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना चार तासात ताब्यात घेतले आहे. इतर तीन आरोपीचा शोध सुरू आहे, असे खदान पोलिसांनी सांगितले. ‘धुरंदर टू’ चित्रपट बघून आल्यानंतर शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास नशेखोर युवकांची परिसरात चाकू, लोखंडी पाईपच्या बळावर दहशत केल्याची ही घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी कौलखेड भागात घडलेल्या नशेखोर तरुणांनी केलेल्या हल्ल्यात अभिलाष अरविंद हिंगे (वय ३२, रा. न्यू खैतान नगर कौलखेड, अकोला),रवी शंकर उर्फ छोटू गजानन ठाकरे (वय २६, रा. कौलखेड चौक) आणि हरिभाऊ रमेश रोटे (वय २६, रा. संतोषनगर मलकापूर खडकी अकोला) यांना धारदार शस्त्र व लाट्याकाठ्याच्या साह्याने मारहाण करून गंभीर दुखापत केली. याबाबत तीन गंभीर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. या हल्ल्यातील गंभीर जखमी अभिलाष अरविंद हिंगे याची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचे गांभीर्य पाहता पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तत्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे पथक, खदान व स्थानिक गुन्हे शाखेचे पथके आरोपीच्या अटकेसाठी परिसरात रवाना केले होते. यातील दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना खदान पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले असून, इतर तीन आरोपी यांचा खदान पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथके कसून शोध घेत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे, असे खदान पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनोज केदारे यांनी सांगितले. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घटनेची माहिती मिळताच खदान पोलिस, एलसीबीचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. धुडगूस घालणारे आरोपींमध्ये काही अल्पवयीन होते. सर्व मोटारसायकलवरून आले होते. १५ ते २० वयोगटातील आरोपींपैकी दोघा अल्पवयींनाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर कौलखेड परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. दिवसा घडलेल्या या गोंधळामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये दहशत पसरली आहे.
