तामसा येथील किराणा दुकान फोडले; स्वामी समर्थ सेवा केंद्रातून चांदीचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी) –  नांदेड जिल्ह्यात चोरीच्या दोन घटनांसह मारहाण करून रोख रक्कम हिसकावून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. तामसा येथे किराणा दुकान फोडून ४६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला, तर नांदेड शहरातील स्वामी समर्थ सेवा केंद्रातून २८ हजार रुपयांचा चांदीचा ऐवज चोरीस गेला. दरम्यान, विष्णुपुरी रोडवर एका व्यक्तीला मारहाण करून धमकी देत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ५० हजार रुपये हिसकावून नेले. या तिन्ही प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तामसा येथे किराणा दुकान फोडून ४६ हजारांचा ऐवज चोरीस

तामसा (ता. हदगाव) येथील भोकर रोडवरील किराणा दुकानात अज्ञात चोरट्याने घरफोडी केली. २० ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० ते २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान चोरट्याने दुकानाच्या मागील बाजूचे पत्रे कापून आत प्रवेश केला. दुकानातील रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण ४६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी महेंद्र नरेंद्र लाभशेटवार (वय २७, रा. तामसा) यांच्या फिर्यादीवरून हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) व ३०५(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नागरगोजे करीत आहेत.

स्वामी समर्थ सेवा केंद्रातून चांदीचा ऐवज लंपास

नांदेड शहरातील मगणपुरा येथील स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या गाभाऱ्यातून २८ हजार रुपये किमतीचा चांदीचा ऐवज चोरीस गेल्याची घटना १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. सायंकाळी ४.०६ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात महिलेने हा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद महेंद्र गोविंदराव गाढे (वय ४७, रा. मगणपुरा, नांदेड) यांनी दिली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सय्यद तपास करीत आहेत.

विष्णुपुरी रोडवर मारहाण करून ५० हजार रुपये हिसकावले

नांदेड येथील विष्णुपुरी रोडवरील सरकारी दवाखान्याजवळ २० ऑक्टोबर रोजी रात्री ९.२४ वाजण्याच्या सुमारास लुटमारीची घटना घडली. लहू नागनाथ उंडरे (वय ३५, रा. ढाळेगाव, ता. अहमदपूर) हे रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना मारहाण करून धमकी दिली. त्यानंतर त्यांच्याजवळील ५० हजार रुपये रोख हिसकावून दोघांनी घटनास्थळावरुन पळ काढला. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३६३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२), ११५(२), ३५१(२) व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, पुढील अटकेची कारवाई सुरू असल्याची माहिती देण्यात आली. पोलीस हवालदार शिंदे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. जिल्ह्यात चोरी व लूटमारीच्या या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

 


Post Views: 186










What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search