शहरातील ईदगाह मैदानावर ईद-उल-फित्रची नमाज संपल्यानंतर आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. ईदगाह मैदानापासून वाजेगावकडे जाणाऱ्या गोदावरी नदीवरील बंधाऱ्याच्या रस्त्यावर एका दुचाकीला अचानक स्फोट होऊन आग लागली. या घटनेत दुचाकीस्वार युवक सुमारे 90 टक्के भाजल्याची माहिती मिळत आहे.
आज सकाळी सुमारे 9.25 वाजण्याच्या सुमारास खुदबईनगरहून वाजेगावकडे जाणारा एक युवक बंधाऱ्याच्या रस्त्याने जात होता. बंधाऱ्याचा रस्ता पार करून पुढे चढावर जात असताना अचानक त्याच्या दुचाकीत स्फोट झाला. स्फोटानंतर तो खाली पडला आणि क्षणातच दुचाकीला आग लागली.
युवकाच्या कपड्यांना सुरुवातीला थोडी आग लागली होती. मात्र, तो पुन्हा जळणाऱ्या गाडीच्या जवळ गेल्यामुळे आगीचा भडका वाढला आणि तो गंभीररित्या भाजला. स्फोटाच्या ठिकाणी असलेल्या झाडांच्या फांद्यासुद्धा आगीमुळे जळाल्या.
Video Link : https://www.instagram.com/p/DWI5DlWAmDI/
घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्काळ प्रसंगावधान राखत नमाजासाठी आणलेल्या चटईच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्या परिसरात आधीपासूनच पोलीस बंदोबस्त असल्यामुळे त्वरित ॲम्बुलन्स बोलावण्यात आली आणि जखमी युवकाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, काही नागरिकांनी बनवलेल्या व्हिडिओंमध्ये एकापेक्षा अधिक स्फोट होत असल्याचे दिसत असून त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार जळालेल्या दुचाकीचा क्रमांक MH 43 AA 9252 असून, आरटीओ ॲपनुसार वाहन मालकाचे नाव शाम बाबाराव घाटगे असे दर्शविले जात आहे. तथापि, याला अद्याप प्रशासनाकडून दुजोरा मिळालेला नाही.
जखमी युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस या घटनेचा तपास करत असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे यांनी केले आहे.
