Weather Update | मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? तारीख आली समोर
Weather Update | कडक उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांची प्रगती वेगाने सुरू असून पुढील 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार परिस्थिती अनुकूल राहिल्यास जूनच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन होऊ शकते.
मुंबई भारतीय हवामान विभाग (IMD) चे संचालक बिक्रम सिंह (Bikram Singh) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जून रोजी मान्सून केरळमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झाले असून त्याची वाटचाल समाधानकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील काही दिवसांत तो देशाच्या अंतर्गत भागांकडे सरकेल.
मान्सूनचा वेग सामान्य राहिला तर केरळमध्ये दाखल झाल्यानंतर साधारण एक आठवड्याच्या आत तो महाराष्ट्राच्या सीमेजवळ पोहोचू शकतो. 10 ते 11 जूनदरम्यान कोकण किनारपट्टीसह मुंबईत मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना मुख्य मान्सूनच्या पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
राज्यात वादळ-पावसाचा इशारा :
दरम्यान, केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. महाराष्ट्रात अद्याप मान्सूनपूर्व सरींचे वातावरण असून अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. पुढील तीन ते चार दिवसांत या पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून कोकण आणि गोवा परिसरात अधिक जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने सातारा, कोल्हापूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि जालना या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांत मध्यम ते तीव्र स्वरूपाचे वादळ येऊ शकते. तसेच ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने झाडे पडणे किंवा फांद्या तुटण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी वादळी वातावरणात सुरक्षित ठिकाणी थांबावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्र (MMR) मध्ये पुढील 48 तासांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः संध्याकाळच्या वेळेत वादळी हालचाली वाढू शकतात. 4 जूनपासून वातावरणात बदल जाणवण्याची शक्यता असून ढगाळ हवामान आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींमुळे तापमानात घट होईल. तसेच 8 आणि 9 जूननंतर राज्यातील अनेक भागांत पावसाचा विस्तार वाढून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
