पाषाण तलावातील प्रदूषण रोखण्यासाठी महापौरांचे निर्देश:तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याचे प्रशासनाला आदेश
![]()
पुणे शहरातील महत्त्वपूर्ण जलस्रोत असलेल्या पाषाण तलावातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महापौर यांनी गुरुवारी तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाला तातडीने ठोस व परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे कडक निर्देश दिले. या पाहणीदरम्यान तलावातील पाण्याची गुणवत्ता, वाढता दूषितपणा तसेच सीओडी (केमिकल ऑक्सिजन डिमांड) व बीओडी (बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड) यांच्या पातळीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तलावात येणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रदूषणात लक्षणीय वाढ होत असल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात उभारण्यात आलेल्या एसटीपी (सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट) प्रकल्पांची कार्यक्षमता तपासण्याचे आदेश देण्यात आले. प्रक्रिया केलेले पाणी निर्धारित निकषांनुसारच तलावात सोडले जाईल यासाठी काटेकोर देखरेख ठेवण्याचे निर्देशही महापौरांनी दिले. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीपर्यंतचे नाले, पाणीप्रवाह व संबंधित यंत्रणांची सखोल पाहणी करण्यात आली. नाल्यांमध्ये साचलेला गाळ, अडथळे तसेच अनधिकृत सांडपाणी सोडण्याच्या प्रकारांवर तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. तलावात थेट जाणारे दूषित पाणी रोखण्यासाठी स्वतंत्र नाले उपयोजना प्रभावीपणे राबविण्याचे आदेशही देण्यात आले. पाषाण तलावाचे संवर्धन व प्रदूषणमुक्ती ही शहराच्या पर्यावरणीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करून अल्पावधीत ठोस व दृश्यमान परिणाम साध्य करावेत, असे आवाहन महापौरांनी केले. या पाहणीदरम्यान नगरसेविका रोहिणी चिमटे व नगरसेविका मयुरी कोकाटे उपस्थित होत्या. प्रशासनाच्या वतीने उपायुक्त (पर्यावरण) किशोरी शिंदे व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांनी सहभाग घेतला. पाषाण तलावाचे पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी खालील उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत: * एसटीपी प्रकल्प नियमित व पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवून त्यांच्या कार्यक्षमतेत सातत्याने सुधारणा करणे. * नाल्यांमधील सांडपाणी कोणत्याही परिस्थितीत थेट तलावात जाणार नाही, याची खात्री करणे. * तलाव परिसरात विशेष स्वच्छता व प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविणे. * पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करून पारदर्शक अहवाल प्रणाली कार्यान्वित करणे. * स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवून व्यापक जनजागृती मोहीम राबविणे.
