‘गोकुळ’साठी धनंजय महाडिक ॲक्शन मोडमध्ये!:साम, दाम, दंड, भेद वापरा, पण ठराव खेचून आणा; सतेज पाटील गटाला थेट आव्हान




कोल्हापूर जिल्ह्याचे ग्रामीण अर्थकारण आणि राजकारणाचे शक्तिपीठ मानल्या जाणाऱ्या ‘गोकुळ’ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेऊन थेट सतेज पाटील गटावर निशाणा साधला. “या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एकही संचालक निवडून येऊ द्यायचा नाही,” असा चंग बांधत महाडिकांनी कार्यकर्त्यांना ‘आरपार’च्या लढाईसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी ‘ठराव’ ही पहिली आणि महत्त्वाची पायरी असते. हेच ओळखून महाडिकांनी कार्यकर्त्यांना आक्रमक पवित्रा घेण्याच्या सूचना दिल्या. ते म्हणाले, “जास्तीत जास्त ठराव आपल्या बाजूने करण्यासाठी इच्छुकांनी आणि कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे. प्रसंगी साम, दाम, दंड आणि भेद या सर्व मार्गांचा अवलंब करा, पण ठराव आपल्याकडेच आले पाहिजेत. विरोधकांच्या एकाही ठरावाकडे दुर्लक्ष करू नका, त्यांच्यावर तुटून पडा.” आम्ही २५ वर्षे यशस्वी नेतृत्व केले गेल्या पाच वर्षांतील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीका करताना महाडिक म्हणाले, “आम्ही गोकुळचे २५ वर्षे यशस्वी नेतृत्व केले आहे. आमचा अनुभव दांडगा असून आजही आमची विचारांची माणसे आमच्यासोबत खंबीरपणे उभी आहेत. सध्याच्या कारभाराला कंटाळलेले अनेक संस्थाचालक आमच्या संपर्कात आहेत. आता वेळ आली आहे या सत्तेला खाली खेचण्याची आणि पुन्हा एकदा पारदर्शक कारभार आणण्याची.” महायुती एकसंधपणे भिडणार या निवडणुकीत महायुती (भाजप, शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रवादी-अजित पवार गट) पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत महाडिकांनी दिले. “काँग्रेस आणि महाविकास आघाडी हाच आपला या निवडणुकीतील मुख्य शत्रू आहे. त्यामुळे वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून महायुती म्हणून कामाला लागा. विरोधकांचा सुपडा साफ होईल इतके काम आपल्याला तळागाळात करायचे आहे,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. हे ही वाचा… जागतिक शांततेसाठी भारताने पुढाकार घ्यावा:अण्णा हजारेंचे पंतप्रधान मोदींना पत्र, मध्यपूर्वेतील तणावावर व्यक्त केली चिंता इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. जागतिक स्तरावर वाढत्या तणावामुळे मानवतेला धोका निर्माण झाला असून, भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी अण्णांनी या पत्राद्वारे केली आहे. गेल्या आठवडाभरात मध्यपूर्वेत तणाव कमालीचा वाढला असून, युद्धाचे ढग गडद झाले आहेत. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *