तरुणाचा रेल्वेच्या हाय व्होल्टेज वायरजवळ धिंगाणा:खांडबारा रेल्वे स्थानकावरील घटना; रेल्वे वाहतूक विस्कळीत, पाहा VIDEO




नवापूर तालुक्यातील खांडबारा रेल्वे स्थानकावर एका माथेफिरू तरुणाने रेल्वेच्या डब्यावर चढून हायव्होल्टेज ओव्हरहेड वायरलगत धिंगाणा घातल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकारामुळे रेल्वे स्थानकावर उपस्थित प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आणि काही काळ रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 10 ते 10.30 च्या सुमारास भुसावळ-सुरत रेल्वे मार्गावरील खांडबारा स्थानकात ही घटना घडली. एक माथेफिरू तरुण रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या एका प्रवाशी रेल्वेच्या डब्यावर चढला. डब्यावर चढल्यानंतर त्याने तिथे इकडून तिकडे पळण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, रेल्वेला वीजपुरवठा करणाऱ्या 25,000 ल्टच्या जिवंत तारांच्या अगदी जवळून तो तरुण जात होता. त्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. एका तासाच्या मनधरणीनंतर उतरला खाली हा प्रकार लक्षात येताच स्टेशन मास्तर आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील विद्युत पुरवठा त्वरित खंडित करण्यात आला. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी सदर तरुणाला खाली उतरवण्यासाठी अनेक विनंत्या केल्या, मात्र तो तरुण कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर अर्धा ते एक तासाच्या मनधरणीनंतर त्याला खाली उतरवण्यात यश आले. पण तोपर्यंत रेल्वे कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ झाली होती. दुसरीकडे, रेल्वेच्या जिवंत वीजतारांच्या इतक्या जवळ जाणे अत्यंत धोकादायक असते. त्यामुळे अशा प्रकारांपासून नागरिकांनी दूर राहावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या घटनेची पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे काही काळ रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर रेल्वे सुरक्षा बल आणि स्थानिक पोलिसांनी त्या तरुणाची चौकशी सुरू केली आहे. तो नेमका कोण आहे, तसेच त्याने हा प्रकार का केला याचा तपास केला जात आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना रेल्वे परिसरात सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. हे ही वाचा… BMW कार ट्रक, कंटेनरला धडकली:कारमधील चौघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर जखमी; औसा – तुळजापूर महामार्गावरील भयंकर घटना भरधाव वेगातील कार लाकडांची वाहतूक करणाऱ्या ट्रक व कंटेनरला धडकल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात सांगलीच्या एका व्यापाऱ्यासह 4 जण ठार, तर 2 जण गंभीर झालेत. लातूर जिल्ह्यातील औसा – तुळजापूर महामार्गावर शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. सांगली येथील धनराज काशीनाथ जाधव (49) काही कामानिमित्त आपल्या बीएमडब्ल्यू कारमधून (एमएच 04 ईजी 7500) लातूरला आले होते. शुक्रवारी रात्री काम आटोपून ते परत निघाले होते. रस्त्यात शिवली येथे जेवण केल्यानंतर ते सहकाऱ्याला सोडण्यासाठी औशाला आले होते. औशानजिक रात्री 10.15 च्या सुमारास त्यांची कार लाकडाने भरलेल्या ट्रक (एमएच 25 यू 0522) व एका कंटेनरला (एमएच 12 एफसी 7642) धडकली. त्यात धनराज जाधव यांच्यासह आबासाहेब साळुंके (36), शुभम शेषेराव पाटील (26), किसन रामलिंग साळुंके (49, तिघेही रा. बोरगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. तर जयहिंद विश्वास जाधव (30, रा. औसा) व विनायक श्रीकांत हालदर (28, रा. सांगली) हे 2 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर लगतच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *