संसाराची स्वप्ने राहिली अधुरीच:पाटणमध्ये पिकअप-दुचाकीच्या अपघातात नवदाम्पत्य ठार, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न
![]()
संसाराची स्वप्ने डोळ्यांत घेऊन नातेवाईकाच्या लग्नाला निघालेल्या नवदाम्पत्यावर काळाने भीषण झडप घातली आहे. विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर पाटण तालुक्यातील येरफळे गावच्या हद्दीत सोमवारी दुपारी पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात राजू झोरे (वय २५) आणि राणी झोरे (वय २३) हे पती-पत्नी जागीच ठार झाले. अवघ्या दहा दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. हातावरची मेहंदी आणि अंगाची हळदही अजून उतरली नव्हती, तोच या दोघांचा अंत झाल्याने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सडादाढोली (ता. पाटण) येथील राजू आणि राणी यांचा दहा दिवसांपूर्वीच मोठ्या उत्साहात विवाह पार पडला होता. सोमवारी त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाचे शिराळा (जि. सांगली) येथे लग्न होते. या लग्नासाठी हे दाम्पत्य दुचाकीवरून निघाले होते. मात्र, येरफळे गावच्या हद्दीत समोरून येणाऱ्या एका भरधाव पिकअप गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताची भीषणता काळजाचा थरकाप उडवणारी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार एका ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना समोरून येणाऱ्या पिकअपची (क्र. MH-50-AM-0814) समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचे पुढचे चाक निखळून लांब पडले, तर पिकअपच्या काचेचाही चक्काचूर झाला. या धडकेत राजू झोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या राणी झोरे यांना तातडीने कराड येथील रुग्णालयात हलवण्यात येत होते, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. मेहंदीचा रंग ओसरण्यापूर्वीच होत्याचे नव्हते झाले दहा दिवसांपूर्वी ज्या घरात सनई-चौघड्यांच्या सुरात मंगलमय वातावरण होते, तिथे आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश पाहायला मिळत आहे. सडादाढोली गावावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. नववधूच्या हातावरील मेहंदी अजून तशीच होती, तोच काळाने या जोडीला हिरावून नेल्याने अंत्यविधीवेळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. पिकअप चालक पोलिसांच्या ताब्यात अपघाताची माहिती मिळताच पाटणचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पिकअप चालक सचिन यशवंत मोहिते (रा. बोंद्री, ता. पाटण) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या भीषण अपघाताचा अधिक तपास करत आहेत. हे ही वाचा… मराठीच्या सक्तीवरून रिक्षाचालक युनियन आक्रमक:4 मे पासून 15 लाख चालकांचा राज्यव्यापी संपाचा इशारा, 28 एप्रिलला अल्टिमेटम राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून आता मोठा पेच निर्माण झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ मे पासून या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असतानाच, रिक्षाचालकांच्या सर्वात मोठ्या संघटनेने याविरोधात एल्गार पुकारला आहे. या नियमाच्या निषेधार्थ ४ मे पासून राज्यातील तब्बल १५ लाख रिक्षाचालक बेमुदत संपावर जाण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा…
