![]()
घरात क्रॉस किंवा येशूची प्रतिमा ठेवणे हा धर्मांतराचा पुरावा नाही. धर्मांतराचा दावा सिद्ध करण्यासाठी ठोस दस्तऐवजी पुराव्यांची गरज असते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच एका प्रकरणात सुनावणी करताना दिला. अकोला येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने अनुसूचित जातीच्या (एससी) प्रमाणपत्रासाठी केलेला अर्ज जात पडताळणी समितीने फेटाळला होता. यासाठी समितीने सदर विद्यार्थ्याच्या घरात क्रॉस व येशूच्या प्रतिमा असल्याचा व 1962 मधील शालेय नोंदीत कुटुंबाचा उल्लेख ख्रिश्चन म्हणून असल्याचा दाखला दिला होता. विद्यार्थ्याने जात पडताळणी समितीच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती मुकुलिका जावळकर व न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने उपरोक्त निर्वाळा दिला. कोर्ट म्हणाले, एखाद्या व्यक्तीच्या घरात क्रॉस किंवा येशू ख्रिस्त यांच्या प्रतिमा अथवा मूर्ती असणे हे त्या व्यक्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला याचा पुरावा ठरू शकत नाही. या प्रकरणी धर्मांतराचा दावा सिद्ध करण्यासाठी ठोस दस्तऐवजी पुरावे म्हणजे बाप्तिस्मा विधीचे दस्तऐवजीकरण किंवा बाप्तिस्मा प्रमाणपत्रासारखे ठोस पुरावे आवश्यक असतात. केवळ धार्मिक प्रतीके किंवा जुनी नोंद यावरून धर्मांतर झाल्याचा निष्कर्ष काढता येत नाही. औपचारिक धर्मांतर झाले नाही कोर्टाने असेही नमूद केले की, जात पडताळणी समितीने या प्रकरणी धर्मांतराची औपचारिक प्रक्रिया पार पाडली होती का? याची चौकशी करणे आवश्यक होते. याचिकाकर्त्याने सांगितले आहे की, त्याच्या कुटुंबाने केव्हाही औपाचारिक धर्मांतर केले नाही. त्याने पुढे असेही म्हटले की, जातीय भेदभाव टाळण्यासाठी त्याच्या आजोबांनी शाळेच्या नोंदीत स्वतःला ख्रिश्चन म्हणून नमूद केले होते. पण यासंबंधी कोणतेही धार्मिक धर्मांतर झाले नव्हते. याचिकाकर्त्याने आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ अनेक अधिकृत कागदपत्रांचा दाखला दिला होता. त्यात शाळेच्या व शासकीय नोंदी, तसेच एका नातेवाईकाला देण्यात आलेल्या जात प्रमाणपत्राचाही समावेश होता. या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर न्यायालायने जिल्हा अधिकाऱ्यांनी मांडलेला युक्तिवाद निराधार असल्याचे नमूद केले. तसेच अकोला जात पडताळणी समितीचा निर्णय स्पष्टपणे त्रुटीपूर्ण व विकृत असल्याचे नमूद करत तो तत्काळ प्रभावाने रद्दबातलही केला. तसेच समितीला याचिकाकर्त्याला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जारी करण्याचेही निर्देश दिले. हे ही वाचा… नांदेडमध्ये BHMS च्या विद्यार्थिनीची आत्महत्या:खासगी वसतिगृहात आढळली मृत, NCP चे प्रदेश सचिव जीवन घोगरे यांच्यावर गुन्हा दाखल नांदेड शहरालगतच्या सिडको परिसरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात बीएचएमएसचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने खासगी वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव जीवन घोगरे पाटील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्ह्यासह अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर
घरात येशूची प्रतिमा असणे धर्मांतराचा पुरावा नाही:धर्मांतराचा दावा सिद्ध करण्यासाठी ठोस दस्तऐवजी पुराव्यांची गरज; HC चा निर्वाळा
