संभाजी महाराजांच्या अंत्यविधीबाबत इतिहासात उल्लेख नाही:संभाजी कादंबरीतील अनेक पात्रे काल्पनिक; लेखक विश्वास पाटील यांची कबुली




छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंत्यसंस्काराबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्तऐवजात स्पष्ट उल्लेख आढळत नसल्याचे लेखक विश्वास पाटील यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर कबूल केले आहे. त्यांच्या संभाजी या कादंबरीतील काही पात्रे आणि घटनांचे वर्णन हे ऐतिहासिक तथ्य नसून कल्पनेवर आधारित असल्याचेही त्यांनी उलटतपासणीत मान्य केले. विशेषतः जना परीटिण, गोविंद नाक, दामाजी पाटील आणि पाटलीण ही पात्रे पूर्णपणे काल्पनिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संभाजी महाराजांच्या अंत्यविधीबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर या विधानाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. कोरेगाव भीमा प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगासमोर शुक्रवारी दिवसभर सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील अॅड. शिशिर हिरे यांनी लेखक विश्वास पाटील यांची सविस्तर उलटतपासणी घेतली. विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारताना कादंबरीतील संदर्भ, ऐतिहासिक आधार आणि त्या लिखाणाचा समाजावर होणारा परिणाम यावरही चर्चा झाली. या वेळी उत्तर देताना पाटील यांनी त्यांच्या कादंबरीतील काही उल्लेख काल्पनिक स्वरूपाचे असल्याचे मान्य केले, अशी माहिती अॅड. हिरे यांनी दिली. संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘संभाजी’ या कादंबरीत त्यांच्या अंत्यसंस्काराविषयी उल्लेख करण्यात आला होता. या कथनावरून महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी वाद निर्माण झाला होता. काही गटांनी कादंबरीतील कथनाचा आधार घेत संभाजी महाराजांचा अंत्यविधी विशिष्ट व्यक्तीने केल्याचा दावा केला होता. या दाव्यांमुळे दोन समाजांमध्ये मतभेद वाढल्याचेही सांगितले गेले. या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव येथे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्या घटनेची चौकशी सध्या आयोगाकडून सुरू आहे. उलटतपासणीदरम्यान अॅड. शिशिर हिरे यांनी संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराबाबत ऐतिहासिक पुरावे आहेत का, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना विश्वास पाटील यांनी स्पष्ट केले की, संभाजी महाराजांच्या अंत्यविधीबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्तऐवजात स्पष्ट उल्लेख सापडत नाही. तसेच संभाजी, ही कादंबरी काही ऐतिहासिक तथ्ये आणि भौगोलिक संदर्भ यांच्या आधारे तयार केलेला कल्पनाविलास असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे कादंबरीतील काही घटना आणि पात्रे पूर्णपणे काल्पनिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरेगाव भीमा प्रकरणातील मुद्द्याला नव्याने महत्व याच सुनावणीदरम्यान इतिहासातील काही समकालीन स्रोतांचाही उल्लेख करण्यात आला. जेधे शकवली, मासीरे आलमगिर, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना आणि खाफी खान या तत्कालीन इतिहासकारांच्या लिखाणाचा दाखला देत ‘संभाजी’ कादंबरीतील काही कथनांना ऐतिहासिक आधार नसल्याचे आयोगासमोर मांडण्यात आले. कादंबरीतील लिखाणाचा गैरवापर करून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो निषेधार्ह असल्याचेही विश्वास पाटील यांनी नमूद केले, अशी माहिती अॅड. शिशिर हिरे यांनी दिली. या सुनावणीनंतर कोरेगाव भीमा प्रकरणातील या मुद्द्याला नव्याने महत्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *