डॉ. नीलम गोऱ्हे यांची पोलिस महासंचालकांशी भेट:बेकायदेशीर रेव्ह पार्ट्या, अमली पदार्थ विक्रीवर कारवाईचे आश्वासन
![]()
शिवसेना नेत्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी मुंबईत पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. राज्यातील बेकायदेशीर रेव्ह पार्ट्या, अमली पदार्थ विक्री, गर्भलिंग निदान आणि पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील संघटित गुन्हेगारीसह विविध गंभीर मुद्द्यांवर त्यांनी दाते यांच्याशी चर्चा केली. या भेटीत डॉ. गोऱ्हे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवडमधील बेकायदेशीर रेव्ह पार्ट्या, मुंबईतील अमली पदार्थ विक्री आणि विषारी दारू प्रकरणातील गुन्हेगारी साखळी उघड करण्यावर भर दिला. तसेच, राज्यातील गर्भलिंग निदान प्रकरणांच्या तपास आणि कायदेशीर प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाकडेही त्यांनी लक्ष वेधले. संबंधित यंत्रणांना तातडीने सूचना देऊन कारवाईला गती देण्याची मागणी त्यांनी केली. अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या संशयित ठिकाणांवर सीसीटीव्हीद्वारे ये-जा करणाऱ्या व्यक्ती आणि वाहनांवर प्रभावी नजर ठेवण्याची गरज डॉ. गोऱ्हे यांनी अधोरेखित केली. याव्यतिरिक्त, कौटुंबिक हिंसाचारातील महिलांना तातडीने न्याय आणि मानसिक आधार मिळावा यासाठी ‘भरोसा सेल’ आणि कौटुंबिक हिंसाचार संरक्षण अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी यापूर्वी केली होती. प्रशासनाने या सूचनांची दखल घेऊन परिपत्रक जारी केल्याची माहिती पोलिस महासंचालक दाते यांनी दिली. सर्व जिल्ह्यांतील दक्षता समित्यांमध्ये सदस्य नियुक्त करण्याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी पूर्वी केलेल्या सूचनेचीही गंभीर दखल घेण्यात आली आहे. लवकरच सर्व जिल्ह्यांमध्ये सदस्य नियुक्ती करण्याबाबतचे परिपत्रक काढले जाईल, असे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी स्पष्ट केले. डॉ. गोऱ्हे यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांची तात्काळ दखल घेत पोलिस महासंचालक दाते यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सूचना दिल्या. या प्रकरणांवर संबंधित पोलिस महानिरीक्षकांसोबतच्या नियमित बैठकीत चर्चा करून योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
