One dead in Yerwada jail attack by inmates | येरवडा कारागृहात कैद्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू: दोन आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल – Pune News



येरवडा कारागृहात कैद्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका कैद्याचा शुक्रवारी (१९ मे) ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत कैद्याचे नाव विशाल नागनाथ कांबळे (वय २६

.

आकाश सतीश चंडालिया (वय ३०, रा. जयजवान नगर, येरवडा) आणि दीपक संजय रेड्डी (वय २७, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत) या दोन सराईत गुन्हेगारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळे, चंडालिया आणि रेड्डी हे तिघेही पोलीस दप्तरी नोंद असलेले गुन्हेगार आहेत.

कांबळे २०१९ पासून एका खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात होता, तर चंडालिया एका खुनाच्या गुन्ह्यात आणि रेड्डी खुनी हल्ल्याच्या गुन्ह्यात तुरुंगात आहेत. स्थानिक वर्चस्वाच्या वादातून चंडालिया आणि कांबळे यांच्यात जुने वैमनस्य होते. कारागृहातही त्यांच्यात अनेकदा भांडणे झाली होती. त्यामुळे, चंडालियाने कांबळेचा काटा काढण्याचा कट रचला होता.

शुक्रवारी सकाळी कारागृहातील बराक उघडल्यानंतर कैदी बाहेर आले. मात्र, कांबळे पुन्हा आत जाऊन झोपला. त्याच्यावर पाळत ठेवून असलेल्या चंडालिया आणि रेड्डी यांनी तो झोपेत असतानाच त्याच्यावर हल्ला चढवला. त्यांनी कांबळेच्या डोक्यात आणि कमरेवर अणकुचीदार फरशीच्या तुकड्याने वार केले. या प्रकारामुळे अन्य कैदी घाबरून पळाले.

घटनेची माहिती मिळताच कारागृह रक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. या हल्ल्यात कांबळे गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना कारागृहातून अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *