अमरावती शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठी मोठी चुरस:14 जण इच्छुक, विद्यमान अध्यक्ष बबलू शेखावत यांना विरोध
![]()
अमरावती शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ इच्छुकांनी हे पद स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे विद्यमान अध्यक्ष बबलू शेखावत यांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस पक्षाने सध्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित केले असून, देशभरात ‘सृजन संघटन अभियान’ राबवले जात आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण आणि शहर दोन्ही जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून कौल जाणून घेण्यात येत आहे. यासाठी एआयसीसीचे निरीक्षक, हरियाणाचे आमदार आफताब अहमद आणि राज्याचे निरीक्षक, आमदार भाई जगताप यांनी चार दिवस अमरावतीत तळ ठोकला होता. निरीक्षकांसमोर मांडणी करताना, शहराध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा प्रवक्ते ॲड. दिलीप एडतकर यांनी तर शहर काँग्रेसच्या कारभाराला कंटाळून प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सादर केला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नियमानुसार, अध्यक्षपदावर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या अध्यक्षांना पुन्हा नियुक्त करू नये. बबलू शेखावत यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने २३ डिसेंबर २०२० रोजी अमरावती शहर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांपेक्षा जास्त झाला असून, त्यांचा अर्ज स्वीकारला जाऊ नये, अशी मागणीही काहींनी केली आहे. मुलाखतीच्या काळात विश्रामगृहावर अनेक पदाधिकाऱ्यांशी ‘वन टू वन’ संवाद साधण्यात आला. काही जणांनी सामूहिकरित्याही आपली भूमिका मांडली. पक्षाचा नवा जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष कोण असावा, याबाबत त्यांनी मते जाणून घेतली. ही मते बंद लिफाफ्यात एका अहवालाच्या स्वरूपात २३ किंवा २४ एप्रिल रोजी पक्षश्रेष्ठींकडे सादर केली जातील. त्यानंतर साधारणतः २८ एप्रिलच्या आसपास नव्या नेतृत्वाची निवड घोषित होण्याची शक्यता आहे.
