अमरावती ते नागपूर महामार्गावरील शहरातील अर्जुननगर स्टॉपच्या १०० मीटर अलीकडे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली. ही घटना सोमवारी (दि. ३) सकाळी सुमारे साडेनऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारचे लॉक तोडत मृतदेह ताब्यात घेतला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवालानंतरच याबाबत माहिती समोर येणार आहे. मृतक तरुणाचे नाव विरल सुनील जसापारा (४०, रा. बुटी प्लॉट, राजापेठ, अमरावती) असे आहे. ते प्रॉपर्टी व्यवसाय करत असल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून ते घराबाहेर होते. मात्र, ते कुटुंबीयांच्या नियमित संपर्कात असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी सकाळी अर्जुननगर परिसरातील मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला पांढऱ्या रंगाची कार संशयास्पद अवस्थेत उभी असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. कारमध्ये चालकाच्या सीटवर एक व्यक्ती निश्चल अवस्थेत बसलेली दिसल्याने नागरिकांनी याची माहिती नगरसेवक गुड्डू धर्माळे यांना दिली. त्यांनी तत्काळ गाडगेनगर पोलिसांना कळविले. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान चालकाच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीची मान मागील बाजूस झुकलेली दिसून आली. पोलिसांनी नातेवाईकांना घटनास्थळी बोलावले. कार आतून लॉक होती व चावीही कारमध्येच असल्याने तंत्रज्ञाच्या मदतीने कारचे दार उघडण्यात आले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. पोलिसांच्या पाहणीत कारमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याच्या बाटल्या तसेच एनर्जी ड्रिंक्स आढळून आले. मात्र, मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत प्राथमिक तपासातून कोणताही निष्कर्ष समोर आलेला नाही. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिस उपायुक्त यशवंत सोळंके, एसीपी निलेश ब्राह्मणे, गाडगेनगरचे ठाणेदार गोरखनाथ जाधव यांच्यासह मोठा पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. २६ जुलैपासून घराबाहेर; रविवारी रात्री कुटुंबीयांशी संपर्क विरल जसापारा हे २६ जुलैपासून घराबाहेर होते. यापूर्वीही कामानिमित्त ते चार-पाच दिवस घराबाहेर राहत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. रविवारी रात्री त्यांनी कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला होता. मात्र, सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह कारमध्ये आढळून आल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अर्जुननगर स्टॉपवर उभ्या कारमध्ये तरुणाचा मृतदेह, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट; पोलिसांचा तपास सुरू
