![]()
हिंगोली शहरालगत बळसोंड भागात बनावट कागदपत्रे तयार करून मुळ मालकाच्या परस्पर प्लॉट विक्री करणाऱ्या चौघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात सोमवारी ता. २ सायंकाळी फसवणुकीचा गुुन्हा दाखल झाला आहे. मागील दिड महिन्यातील हा तिसरा गुन्हा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरालगत बळसोंड येथे गट क्रमांक ८५ मधील प्लॉट नंबर ०६ असून त्याचे क्षेत्रफळ ३२४ चौरस मिटर आहे. सदर प्लॉटचे खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून मुळ मालकाच्या परस्पर चौघांनी ता. १७ मार्च २०२५ रोजी हिंगोलीच्या सह दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत तयार केले. दरम्यान, सदर प्रकार प्लॉटच्या मुळ मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने सहदुय्यम निबंधक कार्यालय गाठून या संदर्भात चौकशी सुरु केली होती. यावेळी त्यांनी सदर प्रकाराबाबत सहदुय्यम निबंधक संजय सुंकवाड यांना माहिती दिली. सदर प्लॉट बनावट कागदपत्रे तयार करून खोटा कबुली जबाव नोंदवून प्लॉटची विक्री केल्याचे दिसून आले. या प्रकरणी सह दुय्यम निबंधक सुंकवाड यांनी आज सायंकाळी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी सुभाष नारायण नायक (रा. वाघोली, ुपुणे), आकाश गंगाधर हलबुर्गे (रा. बळसोंड) शेख जावेद शेख मोहम्मद (रा. हिंगोली) यांच्यासह अन्य एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संदीप मोदे, उपनिरीक्षक गिरी, जमादार अशोक धामणे, संजय मार्के, शेख मुजीब पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, बनावट कागदपत्रे तयार करून मुळ मालकाच्या परस्पर शेती विक्रीच्या यापुर्वी दोन घटना घडल्या असून या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर आता हा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे.
हिंगोलीत बनावट कागदपत्रांद्वारे प्लॉटची परस्पर विक्री:चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
