दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश-देवी शारदा विवाह सोहळा:गाणपत्य सांप्रदायाच्या परंपरेनुसार 'शारदेश मंगलम्' उत्साहात संपन्न

0
b6c502b1-d361-4e1f-bbab-c3c893de0f99_1776596634165.jpg




पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात गाणपत्य सांप्रदायाच्या परंपरेनुसार श्री गणेश आणि देवी शारदा यांचा ‘शारदेश मंगलम्’ विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी मंदिर परिसर सनई आणि मंगलाष्टकांच्या स्वरांनी निनादला होता. दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांनी भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह सोहळा थाटात पार पडला. संकेत मते यांच्यासह तुषार रायकर यांनी सपत्नीक पूजन केले. या मंगल सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गणरायाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. विवाह सोहळ्यापूर्वी मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. रविवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पहाटे ४ वाजता गायिका विदुषी मंजुषा पाटील यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. सकाळी ८ वाजता गणेशयाग देखील झाला. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी या सोहळ्याचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, “श्री गणेशांच्या दोन शक्तींना गाणपत्य संप्रदायात देवी सिद्धी आणि देवी बुद्धी या नावाने ओळखले जाते. भगवंताच्या क्रियाशक्तीला देवी सिद्धी, तर ज्ञानशक्तीला देवी बुद्धी म्हणतात. अश्विन महिन्यात शरद ऋतू असल्याने या काळात प्रगट झालेल्या देवी बुद्धीला शारदा असे संबोधले जाते. शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे तिची उज्ज्वलता आणि आल्हाददायकता असल्याने तिला शारदा म्हणतात. देवी बुद्धीने प्रसन्नता प्राप्त होत असल्याने तिला शारदा असे म्हटले जाते. अशा देवी शारदेचा भगवान श्री गणेशांसोबतचा महामिलनाचा सोहळा म्हणजे श्री शारदेश मंगलम् आहे.” या सोहळ्यानिमित्त आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना, तसेच वृद्धाश्रम, दिव्यांग मुलांच्या संस्था आणि मंदिरात उपस्थित भाविकांना वाटण्यात येणार आहे. रात्री भारतीय वारकरी महिला मंडळाच्यावतीने उटीचे भजन देखील आयोजित करण्यात आले होते.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks