पाचव्या वर्षीही पैठण तालुका राहणार टॅँकरमुक्त:प्रशासनाचे नियोजन फायदेशीर, मराठवाड्याला यंदा दिलासा‎




सलग तीन वर्षे दमदार पावसामुळे मराठवाड्यातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून यंदाच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे. मराठवाडा विभागातील प्रकल्पांमध्ये सरासरी ७० टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र पुढील पावसाळ्यात कमी पावसाचा अंदाज लक्षात घेता पाणी जपून वापरण्याची गरज असल्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सध्याची परिस्थिती पाहता पैठण तालुक्यातील गावांना किमान चार महिने तरी टँकरची गरज भासणार नाही, अशी माहिती गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड यांनी दिली. सलग पाचव्या वर्षी तालुका टँकरमुक्त राहण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मध्यम प्रकल्पांमध्ये सुमारे ७० टक्के, तर लघु प्रकल्पांमध्ये ६० टक्के साठा आहे. त्यामुळे यंदा टंचाईचे गंभीर चित्र निर्माण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जायकवाडी धरण येथून छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, गेवराईसह तब्बल २०५ गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच वाळूज, चिकलठाणा व पैठण येथील एमआयडीसी क्षेत्रालाही पाणी दिले जाते. ३१ जुलैपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती प्रशांत संत यांनी दिली. जिल्हाधिकारी स्वामी यांनी पाणी बचतीवर भर देण्याचे आवाहन केले आहे. पुढील हंगामात कमी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन उपलब्ध साठा जास्तीत जास्त काळ टिकवण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, जायकवाडी धरण येथे सध्या सुमारे ७५ टक्के जलसाठा असून सिंचनासाठी पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे यंदाचा उन्हाळा मराठवाड्यासाठी दिलासादायक ठरणार असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *