राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत समिना शेख प्रथम:अमरावती जिल्ह्यातील सहा कर्मचाऱ्यांचाही उल्लेखनीय सहभाग

0
5344c3aa-29e5-4304-9072-9b337d5217f6_1772121455609.jpg




अमरावती जिल्ह्यातील समिना शेख यांनी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्राथमिक शिक्षक गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्यासह जिल्ह्यातील एकूण सहा कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेत उल्लेखनीय सहभाग नोंदवत पारितोषिके जिंकली. ही स्पर्धा २०२५-२६ साठी आयोजित करण्यात आली होती. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथे २३ फेब्रुवारी रोजी द्वितीय फेरीतील सादरीकरण झाले, तर २४ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या स्पर्धेत राज्यभरातून एकूण १०७० शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. पहिल्या फेरीनंतर प्रत्येक गटातून सुमारे दहा व्यक्तींची राज्यस्तरीय फेरीसाठी निवड करण्यात आली होती. या पारितोषिक वितरण समारंभाला संचालक डॉ. हेमंत वसेकर, सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, उपसंचालक इब्राहीम नदाफ, संशोधन विभागप्रमुख डॉ. दत्तात्रय थिटे आणि परीक्षक डॉ. दीपक चांदुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अमरावती जिल्ह्यातून पूर्वप्राथमिक अंगणवाडी गटात अंगणवाडी सेविका प्रियंका खरकाटे (सालनापूर, पं.स. धामणगाव रेल्वे) आणि सारिका धामोळे (दहीगाव, पं.स. अंजनगाव) यांनी यश मिळवले. तसेच, माध्यमिक शिक्षक गटात स्वप्नील वानखडे (भारतीय विद्यालय, अमरावती) आणि विनायक ताथोड (रामकृष्ण विद्यालय कांडली, अचलपूर) यांनी, तर पर्यवेक्षकीय अधिकारी गटात डॉ. विजय शिंदे यांनी राज्यस्तरीय पारितोषिकांवर आपले नाव कोरले. प्राथमिक शिक्षक गटात प्रथम आलेल्या समिना शेख अनिस यांनी जिल्हा परिषद उर्दू शाळा, धामोरी येथे ‘आओ नई खिडकी खोले’ हा ग्रंथालयावर आधारित नवोपक्रम सादर केला. त्यांच्या या उपक्रमामुळे धामोरी गावातील विद्यार्थी आणि पालकही अवांतर पुस्तक वाचनासाठी प्रेरित झाले आहेत. जिल्हा परिषद उर्दू शाळेत ‘पुस्तक दानपात्र’ च्या माध्यमातून ८०० हून अधिक पुस्तके जमा करण्यात आली आहेत. या उपक्रमांतर्गत सर्वाधिक वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘रीडर ऑफ द वीक’ आणि ‘रीडर ऑफ द मंथ’ असे पुरस्कार दिले जातात. विशेष म्हणजे, या उपक्रमामुळे धामोरीतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी आता पुस्तकांचा कप्पा तयार झाला आहे, ज्यामुळे वाचनाची सवय वाढण्यास मदत होत आहे.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks