मोगलांचा इतिहास कालखंड म्हणून शिकवला, व्यक्तीपूजेसाठी नव्हे:काँग्रेसचे गोपाळदादा तिवारी यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर, भूमिका चुकीची




राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या काळात मोगलांच्या इतिहासाला अधिक महत्त्व देऊन छत्रपतींना दुय्यम स्थान दिल्याचा आरोप केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने फडणवीस यांचे वक्तव्य तथ्यहीन आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन या आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, मोगलांचा इतिहास ‘कालखंड’ म्हणून शिकवला गेला, व्यक्तीपूजेसाठी नव्हे. दीर्घकाळ टिकलेल्या मोगल साम्राज्याचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट असणे स्वाभाविक आहे. मुख्यमंत्र्यांनी चौथीच्या अभ्यासक्रमातील ‘शिवछत्रपती’ हे संपूर्ण पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित असल्याचे सोयीस्करपणे विसरू नये, असा आरोप तिवारी यांनी केला. तिवारी यांनी टिपू सुलतानाने ७५ हजार हिंदूंची हत्या केल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या दाव्यासाठी ठोस पुरावे सादर करण्याची मागणी त्यांनी केली. ब्रिटिश वसाहतवादी लेखकांनी टिपू सुलतान यांच्याबद्दल केलेले लेखन एकतर्फी असल्याचे अनेक इतिहास अभ्यासकांचे मत आहे, तसेच ‘मराठी विश्वकोष’मध्येही काही संदर्भांच्या विश्वसनीयतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत, असे त्यांनी नमूद केले. काँग्रेसने भाजपला सवाल केला की, त्यांच्या पूर्वसुरी भारतीय जनसंघ काळात किंवा इतर संवैधानिक पदांवरील नेत्यांनी टिपू सुलतान यांच्या नावाने कार्यक्रम व स्मारके मान्य केली होती, त्यावेळी आक्षेप का घेतला गेला नाही? निजामशाही, मोगल आणि शिवशाही यांसारख्या विविध सत्ताकाळातला इतिहास हा भारताच्या भूतकाळाचा अविभाज्य भाग आहे. इतिहास पुसून टाकण्याऐवजी त्याचा वस्तुनिष्ठ अभ्यास करणे आवश्यक आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. सध्याच्या ज्वलंत प्रश्नांकडून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी इतिहासाचा राजकीय वापर केला जात असल्याचा आरोप करत तिवारी यांनी सामाजिक सलोखा बिघडवू नये, असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *