​’तुम्ही कोण विचारणारे?​’ चा खर्चिक परिणाम; पोलीस कर्मचाऱ्याची विचारणा केली महागात, वाचा निकाल


पोलिसांची कर्तव्यातील निष्ठा आणि कायद्याचे पालन न केल्यास होणारी कारवाई याचे हे उत्तम उदाहरण

​ नांदेड,(प्रतिनिधी) –  सार्वजनिक रस्त्यावर मध्यरात्रीनंतर शांतता भंग केल्याबद्दल विचारणा करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यालाच तू कोण विचारणारा? आपले काम कर, नाहीतर तुला दाखवतो अशी धमकी देणाऱ्या आरोपीला अखेर न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. या प्रकरणात एका आरोपीला दोषी ठरवत त्याला दोन वर्षे पर्यवेक्षण अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

ही घटना २५ ऑक्टोबर २०१८ ची आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस अंमलदार माधव नारायण​ गिरी हे आपल्या सहकाऱ्यासह रात्रीचे पेट्रोलिंग करत होते. महालक्ष्मी ऑइल शोरूमजवळ त्यांच्या निदर्शनास आले की दोन जण मध्यरात्रीच्या शांततेत सार्वजनिक रस्त्यावर मोठ्याने आरडाओरड करीत आहेत. त्यांनी त्या दोघांना शांतता भंग करू नका असे सांगितले असता, त्या दोघांनी पोलिस कर्मचाऱ्यांनाच उद्देशून अपशब्द वापरत आम्हाला विचारण्याची तुला काय ताकद? तू तुझे काम कर, नाहीतर तुला दाखवून देऊ​ अशी धमकी दिली.

यावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात माधव नारायण​ गिरी यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ (हल्ला), २९४ (अश्लील शब्द), ५०६ (गुन्हेगारी धमकी) आणि ३४ (सामाईक हेतू) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचबरोबर ​हत्यार कायद्यांतर्गतही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांनी पूर्ण केला.

हे प्रकरण न्यायालयात पोहोचले असता, अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. सोलंकर यांनी या प्रकरणातील पाच साक्षीदारांची सविस्तर चौकशी केली. पुराव्यांची सखोल छाननी केल्यानंतर न्यायाधीश सोलंकर यांनी आरोपी सुधीर गोपाळराव कदम (वय ३२) याला भारतीय दंड संहितेचे कलम ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत दोषी ठरवले. मात्र, या प्रकरणातील दुसऱ्या आरोपी सुनील कदम याच्यावरील आरोप पुराव्याअभावी सिद्ध होऊ शकले नाहीत.

न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
दोषी सुधीर कदम याला थेट तुरुंगात पाठविण्याऐवजी न्यायालयाने समाजसुधारणेचा मार्ग अवलंबला. न्यायाधीश सोलंकर यांनी त्याला दोन वर्षे पर्यवेक्षण अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली राहण्याचे आदेश दिले आहेत. या कालावधीत त्याने कोणताही अनुचित प्रकार केल्यास त्याला थेट शिक्षा भोगावी लागू शकते. याशिवाय, पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून ही रक्कम फिर्यादी पोलीस कर्मचारी माधव नारायण​ गिरी यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणाची बाजू न्यायालयात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ​पी.व्ही. बुलबुले यांनी सादर केली. शिक्षेच्या वेळी सहाय्यक सरकारी अभियोक्ता एम. ए. ​बतुल्ला (डांगे) यांनी आपली बाजू मांडली. तर आरोपीतर्फे वकील बी.एम. कुंभेकर यांनी बाजू मांडली.​पोलीस ठाणे शिवाजी नगर येथील पोलीस अंमलदार दीपाली कांबळे यांनी पैरवी अधिकाऱ्याची भूमिका पार पाडली. 

हा निकाल कायद्याप्रति निष्ठा आणि कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान राखणारा तसेच समाजाला शांतता राखण्याचा संदेश देणारा ठरला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *