![]()
नागपूरमधील प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) मध्ये शिस्तभंगाचा एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. संस्थेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता रिसॉर्टवर रात्रभर पूल पार्टी केल्याबद्दल आयआयएम नागपूरने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत बसण्यापासून रोखले आहे. या निर्णयामुळे कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेविरुद्ध मूक निदर्शने केली आहेत. हे संपूर्ण प्रकरण शनिवार, १४ फेब्रुवारी रोजी घडले. आयआयएम नागपूरमधील एमबीए अभ्यासक्रमाचे सुमारे ७० ते ७५ प्रथम आणि द्वितीय वर्षाचे विद्यार्थी एका रिसॉर्टवर पूल पार्टीसाठी गेले होते. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी (सेंड-ऑफ) विविध विद्यार्थी क्लब्सनी ही पार्टी आयोजित केली होती. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी रजिस्टरमध्ये ‘घरी जात असल्याची’ नोंद केली होती, मात्र प्रत्यक्षात ते रिसॉर्टवर गेले होते. रात्रभर रिसॉर्टवर पार्टी करून दुसऱ्या दिवशी सकाळी संस्थेत परतल्यावर त्यांना प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. नियमांचे उल्लंघन करून रात्रभर बाहेर राहिल्यामुळे प्रशासनाने या विद्यार्थ्यांवर कडक पवित्रा घेतला. सोमवारी रात्री आयआयएम प्रशासनाने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्यांना मिड-टर्म परीक्षा देता येणार नाही, असे ई-मेलद्वारे कळवले. ही परीक्षा मंगळवार, २४ फेब्रुवारीपासून सुरू होणार होती. दुसरीकडे, द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा २५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. परीक्षेला बसू न दिल्यास करिअरचे मोठे नुकसान होईल, या भीतीने विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. दोन्ही वर्षांच्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी एकत्र येत संस्थेच्या आवारात मूक निदर्शने केली आणि परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. अखेर प्रशासनाने आपली बाजू स्पष्ट केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रकरणात प्रशासनाने पार्टीत सहभागी विद्यार्थिनींच्या पालकांना फोन करून याची माहिती दिली. ‘तुमच्या मुलींनी संस्थेचे नियम मोडले असून त्या रात्रभर बाहेर होत्या,’ असे पालकांना सांगण्यात आले. मात्र, केवळ विद्यार्थिनींच्याच पालकांना फोन का करण्यात आला आणि मुलांच्या पालकांना का नाही, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. हा भेदभाव असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. आयआयएमच्या नियमांनुसार, सर्व विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्येच राहावे लागते. रात्री १० वाजेनंतर बाहेर जाण्यास मनाई आहे आणि कोणत्याही कारणास्तव बाहेर जायचे असल्यास संस्थेला पूर्वकल्पना देणे अनिवार्य असते. संबंधित विद्यार्थ्यांनी रजिस्टरमध्ये आपण घरी जात असल्याची नोंद केली होती, जी नियमांचे उल्लंघन करणारी होती.
आयआयएम नागपूर: विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून रोखले:नियम मोडत रिसॉर्टवर पूल पार्टी केल्याने प्रशासनाचा कठोर निर्णय
