'पोलीस भरती' झाल्याचे सांगून तरुणाने वाटले पेढे:नऱ्हे येथे फसवणूक करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
![]()
पुणे, प्रतिनिधी: नऱ्हे येथील एका तरुणाने आपण पोलीस दलात भरती झाल्याचे खोटे सांगून सोसायटीत पेढे वाटले आणि चौकात अभिनंदनाचे फलक लावले. नऱ्हे पोलीस ठाण्यातील कर्मचारी त्याचे अभिनंदन करण्यासाठी गेले असता, हा प्रकार उघडकीस आला. समाजात प्रभाव पाडण्यासाठी तरुणाने ही बतावणी केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ऋषीकेश राजू जाधव (वय २६, रा. तिडके डेअरीजवळ, नऱ्हे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषीकेशचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. त्याला पोलीस दलात भरती होण्याची इच्छा होती, परंतु उंची कमी असल्यामुळे त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. कुटुंबीयांनी त्याला व्यवसायावर लक्ष केंद्रित करून लग्नाचा विचार करण्यास सांगितले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याने कुटुंबीयांना आपण पोलीस दलात भरती झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने सोसायटीत आणि चौकात स्वतःचे अभिनंदन करणारे फलक लावले. या फलकांवर त्याचे छायाचित्र आणि पोलीस दलाचे बोधचिन्ह होते. याशिवाय, ऋषीकेशने पोलीस गणवेशातील छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित केली होती. ही माहिती मिळाल्यानंतर नऱ्हे पोलीस ठाण्यातील कर्मचारी त्याचे अभिनंदन करण्यासाठी गेले. त्यावेळी चौकशी केली असता, ऋषीकेशची पोलीस दलात निवड झाली नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्याचा खोटेपणा देखील उघडकीस आला. शासकीय सेवेत निवड झाली नसतानाही त्याने पोलीस गणवेश परिधान करून छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास नऱ्हे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार एस शिंदे करत आहेत.
