“मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचे आहेत. असे मंत्री राज्याच्या नशिबी आल्यावर तरुणांचा पारा चढणार नाही तर काय होईल?” असा टोला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लगावला होता. यावर आता भाजप नेते अमित साटम यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले,
.
अमित साटम म्हणाले, राज ठाकरे हे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरील फिंगरप्रिंट तपासायची भाषा करतात. पण राज ठाकरे यांच्या पक्षाकडे एकही आमदार किंवा खासदार नाही. मुंबई महापालिकेत त्यांचे फक्त सहा नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्याच मेंदूचे फुटप्रिंट काढायची आवश्यकता आहे.
शिवउद्योग स्थापन करत किती मराठी तरुणांना उद्योगधंदे दिलेत?
पुढे बोलताना अमित साटम म्हणाले, राज ठाकरेंनी भाषण केले आणि आरोप केले, यात नवीन काय आहे? घरात बसून स्टेटमेंट करतात, कार्यकर्त्यांसमोर जे थोडे बहुत राहिले आहेत त्यांच्यासमोर बोलतात. राज ठाकरे हे स्टँडअप कॉमेडियन झाले आहेत. शिवउद्योग स्थापन करत किती मराठी तरुणांना उद्योगधंदे दिलेत, याचे उत्तर राज ठाकरे देऊ शकत नाही. स्वत: काय केले हे सांगायचे नाही. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी अनेक योजना राबवल्या. अनेक लाखो युवकांना स्कील डेव्हलपमेंटचे काम झाले आहे.
फालतू ॲक्टिंग करण्यापेक्षा मेरिटवर डिबेट करावे
अमित साटम म्हणाले, एमएसएमई काय आहेत? युवक-युवती यांनी उद्योगधंदे स्थापन केले आहेत. स्टार्टअप इंडियासारख्या योजना राबवल्या. भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकाची झाली आहे. राज ठाकरेंनी यावर बोलावे. फालतू ॲक्टिंग करण्यापेक्षा मेरिटवर डिबेट करावे. त्यांना मराठी माणसांचा पुळका आला आहे. त्यांचे ॲडमिशन बालमोहनमध्ये घेऊन दाखवावेच, असे आव्हान देखील साटम यांनी केले आहे.
उद्धव ठाकरे हे मेरिटवर बोलत नाहीत
मुख्यमंत्री पदावर असताना 90 टक्के आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यांचे मुख्यमंत्रीपद, पक्ष, चिन्ह गेले. त्यांच्याकडे आता रोज टीका करण्याशिवाय दुसरे काम उरलेले नाही. मुख्यमंत्री पदावर असताना ते घराबाहेर कितीवेळा पडले याचा तपशील द्यावा, असेही अमित साटम म्हणाले. तसेच पालिकेत सत्ता असताना मुंबईकरांसाठी केलेले एक काम दाखवावे याचे चॅलेंज आहे. राहुल गांधी, उद्धव ठाकरे हे मेरिटवर बोलत नाहीत. मुद्द्यांवर बोलायला त्यांच्याकडे तपशील नाहीत. मिश्किलपणे बोलायचे हेच उद्योग ते करत आहेत, अशी टीका साटम यांनी केली आहे.
नेमके काय म्हणाले होते राज ठाकरे?
मनसे युवा सेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर राज ठाकरेंनी निशाणा साधला. ते म्हणाले, लहानपणी बुद्धी तल्लख व्हावी म्हणून डोक्याला तेल लावायला सांगायचे. एका माणसाने आयुष्यभर तेल चोपडले, पण बुद्धी काही आली नाही, असा टोला त्यांनी लगावला. ‘दगडावरचे ठसे आधारशी लिंक करणार’ या चंद्रकांत पाटलांच्या विधानावर टीका करत ते म्हणाले, “मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचे आहेत. असे मंत्री राज्याच्या नशिबी आल्यावर तरुणांचा पारा चढणार नाही तर काय होईल?” असा खोचक सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.
या संदर्भातील ही देखील बातमी वाचा
दुसऱ्यांनाही आया असतात, तुमच्या ट्रोल आर्मीला आधी आवरा:राज ठाकरेंचा मोदींना इशारा, मोदींवरील चित्रपट करणाऱ्या अभिनेत्यांना ठाकरेंचा टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 20 व्या वर्धापन दिन सोहळ्यात केंद्र सरकार, भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. जेन-झी पिढीच्या प्रश्नांपासून शिक्षणव्यवस्था, ट्रोल संस्कृती, बेरोजगारी आणि चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यांपर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी परखड भूमिका मांडली. वाचा सविस्तर
