![]()
राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याची आक्रमक रणनीती यशस्वीपणे राबवली असल्याचे चित्र दिसत आहे. कल्याण-डोंबिवलीनंतर ठाणे, भिवंडी, अहिल्यानगर आणि आता पनवेल महानगरपालिकेतही भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. पनव
.
पनवेलमध्ये भाजपचा पहिला बिनविरोध विजय प्रभाग क्रमांक 18 (ब) मधून नोंदवण्यात आला. भाजपचे उमेदवार नितीन पाटील यांची येथे बिनविरोध निवड झाली. शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेवकाचा अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाल्याने नितीन पाटील यांचा मार्ग मोकळा झाला आणि पनवेल महापालिकेसाठी मतदानाआधीच भाजपचा पहिला नगरसेवक निश्चित झाला. हा विजय भाजपसाठी प्रतीकात्मकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून, त्यानंतर अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला.
अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी शिवसेना ठाकरे गट, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसच्या सात उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. यामुळे भाजपचे आणखी सात उमेदवार बिनविरोध झाले आणि एकूण बिनविरोध जागांची संख्या आठवर पोहोचली. या सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार निर्विवाद विजयी ठरले असून, केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये नितीन पाटील यांच्यासह रुचिता लोंढे, अजय बहिरा, दर्शना भोईर, प्रियंका कांडपिळे, ममता प्रितम म्हात्रे आणि स्नेहल ढमाले यांचा समावेश आहे. या घडामोडींमुळे पनवेलमध्ये महाविकास आघाडीची मोठी पीछेहाट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पनवेल महापालिकेवर 2017 साली भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली होती. त्या वेळी 78 पैकी 51 नगरसेवक भाजपचे निवडून आले होते. शेकापने 23 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत शिवसेनेला पनवेलमध्ये खातेही उघडता आले नव्हते. मात्र यंदा शिवसेना शिंदे गट भाजपसोबत महायुतीत असल्याने दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे भाजपची ताकद अधिक वाढल्याचे राजकीय चित्र दिसत आहे.
यंदाच्या निवडणुकीसाठी महायुतीने पनवेलमध्ये स्पष्ट आणि मोठ्या प्रमाणात जागावाटप केले आहे. एकूण 78 जागांपैकी भाजप 71 जागांवर लढत आहे, शिवसेना शिंदे गटाला 4 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2 जागा आणि आरपीआय आठवले गटाला 1 जागा देण्यात आली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे चित्र अधिक विखुरलेले दिसत आहे. शेतकरी कामगार पक्ष 33, शिवसेना ठाकरे गट 19, काँग्रेस 12, राष्ट्रवादी शरद पवार गट 7, मनसे 2, समाजवादी पक्ष 1, वंचित बहुजन आघाडी 1 आणि इतर 3 जागांवर निवडणूक लढवत आहेत. मात्र बिनविरोध घडामोडींमुळे या समीकरणांवर मोठा परिणाम झाला आहे.
बिनविरोध विजय सकारात्मक सुरुवात
पनवेल महापालिकेच्या कार्यक्षेत्रात शहरी भागासह ग्रामीण आणि सिडको क्षेत्राचा समावेश होतो. त्यामुळे पाणीपुरवठा, गटारे, सार्वजनिक वाहतूक, नागरी सुविधा आणि वाढते नागरीकरण हे मोठे मुद्दे आहेत. भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी आम्ही आतापर्यंत केलेल्या विकासकामांच्या जोरावर निवडणूक लढवत आहोत, असा दावा केला आहे. महायुती पुन्हा सत्ता स्थापन करेल आणि भाजपचाच महापौर पनवेलमध्ये बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. बिनविरोध विजय ही त्या दृष्टीने सकारात्मक सुरुवात असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे.
महाविकास आघाडीतील विस्कळीतपणामुळे भाजपची सत्ता
पनवेलच्या राजकारणात माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे स्थान नेहमीच निर्णायक राहिले आहे. ठाकूर कुटुंबीय ज्या पक्षात गेले, त्या पक्षाची सत्ता पनवेलमध्ये आली, असा इतिहास आहे. शेकापमध्ये असताना शेकापची सत्ता, काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसची सत्ता आणि भाजपमध्ये आल्यानंतर भाजपची सत्ता प्रस्थापित झाली. यंदा आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेकापमध्ये मोठी फूट पाडली असून शेकापकडे केवळ पाच नगरसेवक उरल्याचे बोलले जात आहे. मजबूत विरोधक नसल्याने आणि महाविकास आघाडीतील विस्कळीतपणामुळे भाजपची सत्ता पुन्हा पनवेल महापालिकेवर येण्याची दाट शक्यता असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
