हिंगोली दलातील भरोसा सेलच्या कार्याचा गौरव:सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप यांना प्रशस्तीपत्र




हिंगोली पोलिस दलाच्या भरोसा सेल विभागाच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पोलिस अधीक्षक लिलाव रोहन यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला आहे. सन 2025 या वर्षात कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये प्रभावी समुपदेशन करून तब्बल 278 विवाहित जोडप्यांचे संसार पुन्हा सुरळीत करण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या समुपदेशनामुळे अनेक कुटुंबे पुन्हा एकत्र येऊन नव्याने संसार सुरू करण्यास सक्षम झाली, त्यामुळे भरोसा सेलवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. पोलिस अधीक्षक यांनी भरोसा सेल येथे कार्यरत पोलिस उपनिरीक्षक शेख महिला पोलिस अंमलदार पेंदोर, अनिता जाधव, सीमा पाटील, वर्षा शिंदे, रविना घुमनर यांची उत्कृष्ठ कामगिरी बाबत प्रशंसा केली आहे. याशिवाय अप्पर पोलिस महासंचालक महिला व बाल अपराध प्रतिबंध, महाराष्ट्र राज्य , मुंबई यांच्या आदेशानुसार हरवलेली मुले व बालके शोधण्यासाठी दिनांक 20/01/26 ते दिनांक 20/02/26 पावेतो ऑपरेशन मुस्कान ही विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान हिंगोली जिल्ह्यातील 6 अल्पवयीन अपहरण झालेले सन 2022 पासून बेपत्ता असलेल्या बालकांना मोहिमे दरम्यान शोधून काढले. अनैतिक मानवी वाहतूक शाखा, सायबर सेल तसेच पोलिस ठाणे हिंगोली ग्रामीण, बासंबा, हट्टा, बाळापूर येथील अधिकारी व अंमलदार यांनी यामध्ये मोलाचा सहभाग घेतला.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन तसेच अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांनी अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले आहे. त्यांच्याबरोबर महिला पोलिस अंमलदार नंदा धोंगडे, आरती साळवे, चालक पोलिस हवालदार सरनाईक यांनी सुद्धा सदर मोहिमे दरम्यान तपास मदत केली आहे.
ऑपरेशन मुस्कान या विशेष मोहिमेदरम्यान केलेल्या कामगिरीमुळे पोलिस प्रशासनाबरोबरच समाजातही समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांच्या सुरक्षेसाठी व कुटुंबसंस्थेच्या जतनासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *