![]()
राज्यातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजप व विरोधी बाकावरील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात चांगलेच वाक्युद्ध रंगले आहे. मंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी एका कवितेद्वारे ठाकरे गटावर निशाणा साधला. त्याला उत्तर म्हणून ठाकरे गटाच्या
.
राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर चिखलफेक करून मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच मुंबई महापालिकेवरून भाजप व ठाकरे गटात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. या प्रकरणी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांत दररोज कलगीतुरा रंगत आहे. आजही मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. पण यावेळी त्यांनी चक्क कवितेतून उद्धव ठाकरे व त्यांच्या हिंदुत्त्वाचा समाचार घेतला. ‘मारली लाथ काँग्रेसने जोराची, आता उभे राष्ट्रवादीच्या (शप) दारात पसरुन पदर, म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर’, असे शेलार यांनी म्हटले आहे.
खाली वाचा आशिष शेलारांची काव्यमय टीका
स्वतः केलेली कामे दुर्बीण लावून स्वतःच शोधत आहेत घरोघरी जाऊन पॉकेट बुक वाटत आहेत “करुन दाखवलं” चे गाताय जर गाणे, पॉकेट बुक मध्ये कशाला लावली मग द्वेषाची पाने?
अंगात नाही बळ तरी काँग्रेसची स्वबळाची भाषा तथाकथित मर्दांच्या पक्षाला मात्र मनसेच्या पांगुळ गाड्याची आशा
मारली लाथ काँग्रेसने जोराची आता उभे राष्ट्रवादी(शप) च्या दारात पसरुन पदर म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर यांनी काय केले.. सजवली याकूब मेमनची कबर
ज्यांच्या जगण्यात उरला नाही भगवान राम काय करणार हे मुंबईकरांसाठी काम ?
दुसरीकडे, ठाकरे गटाचे आमदार तथा विधानपरिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आशिष शेलारांना जशास तसे काव्यमय प्रत्युत्तर दिले आहे. दुसऱ्याच्या कामावर आयत्या रेघोट्या मारत आहेत, उद्योजकांच्या दलालीची दुकाने मुंबईत थाटत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
खाली वाचा अंबादास दानवेंची कविता
दुसऱ्याच्या कामावर आयत्या रेघोट्या मारत आहेत, उद्योजकांच्या दलालीची दुकाने मुंबईत थाटत आहेत..
‘करून दाखवलं’ या शब्दाने तुम्हाला लागलाय अंगार, ठाकरेंच्या भीतीपोटी करतायेत नकलीपणाचा शृंगार..
मुंबईचा पैसे उडवून तरी मुंबईकर मतांची आशा, राज्य कर्जबाजारी करणारे करताहेत मुंबई वाचवण्याची भाषा..
हिंदी भाषा लादणारे ओढून बसलेत मराठीची चादर, आता हे ढोंगी शिकवणार ठाकरेंना हिंदुत्वाचा गजर..
सिकंदर बख्त, आरिफ बेग ज्यांचे संस्थापक नेते, अधून मधून देशभक्तीचे सर्टिफिकेट वाटण्याचे खाज त्यांना येते..
