![]()
भाजप नेते तथा माजी मंत्री भागवत कराड यांनी आपल्या मुलाच्या अवघ्या 1 वर्ष जुन्या कंपनीला एक-दोन नव्हे तर तब्बल 4700 कोटींचे कंत्राट मिळवून दिल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या जयश्री खाडिलकर यांनी केला आहे. हे कंत्राट जायकवाडी धरणावरील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित आहे. स्वतः कराड यांनी आपल्या मुलामुळेच गुजरातला जाणारा हा प्रकल्प महाराष्ट्राला मिळाला असल्याचे मान्य केले आहे, असे खाडिलकर यांनी म्हटले आहे. माजी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी जायकवाडी धरणाच्या पाण्यावर सौरपटल उभारून 1,341 मेगावॉट वीजनिर्मिती करणार्या प्रकल्पाचे जोरदार समर्थन केले होते. कराड यांचे सुपुत्र वरुण हे ‘एलएनके ग्रीन एनर्जी प्रा. लि.’ कंपनीत भागीदार आहेत. या कंपनीने महाराष्ट्रात सौरपटल निर्मिती क्षेत्रात 4700 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्र सरकारशी करार केला आहे. दावोस येथे पार पडलेल्या आर्थिक परिषदेत करण्यात आलेल्या या करारामुळे 2500 जणांना रोजगार मिळणार आहे. आता या कंपनीला शेंद्रा औद्योगिक वसाहतीत 63 एकर जागा देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकरणी उलटसुलट चर्चा सुरू असताना जयश्री खाडिलकर यांनी उपरोक्त आरोप केला आहे. काय म्हणाल्या जयश्री खाडिलकर? जयश्री खाडिलकर या प्रकरणी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाल्या, भाजपने भागवत कराड यांना अचानक खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवले. का पाठवले? तर पंकजा मुंडे यांचा दबाव वाढत होता. त्यांचे बळ वाढत होते. त्यामुळे त्यांच्यापुढे कुणीतरी नेता उभा करायचा म्हणून भागवत कराड यांना प्रमोट करण्यात आले. त्यानंतर त्यांना थेट मंत्रिपदही देण्यात आले. भागवत कराड केंद्रात राज्यमंत्री असताना त्यांना विजेशी संबंधित एका समितीवर घेण्यात आले. आता ते खासदार किंवा मंत्री नाहीत. पण अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ दावोसच्या दौऱ्यावर गेले होते. त्या शिष्टमंडळाने तिथे एलएनके ग्रीन या कंपनीशी करार केला. हा करार तब्बल 4700 कोटींचा आहे. या करारांतर्गत जायकवाडी धरणावर तरंगते सौर पॅनल बसवण्यात येणार आहेत. ही कंपनी भागवत कराड यांचे सुपुत्र वरुण कराड यांची आहे. भागवत कराड यांच्या मते, हे कंत्राट गुजरातला जाणार होते. पण एलएनके ग्रीन कंपनीत माझा मुलगा असल्यामुळे ते कंत्राट महाराष्ट्राला मिळाले. हे त्यांनी खुलेपणाने सांगितले, असे खाडिलकर म्हणाल्या. एलएनके ग्रीन कंपनी वर्षभर जुनी जयश्री खाडिलकर पुढे म्हणाल्या, वरुण कराड यांनी एलएनके ग्रीन ही कंपनी जून 2025 मध्ये स्थापन केली होती. या कंपनीचे भागभांडवल केवळ 25 लाख रुपये आहे. या कंपनीला सौर ऊर्जा निर्मितीचा कोणता पूर्वानुभवही नाही. अशा नवख्या कंपनीला तब्बल 4700 कोटींचे कंत्राट देण्यात आले आहेत. या कंपनीत अजून 2 पार्टनर आहेत. परितोश लादानी हा त्यापैकी एक आहे. या लादानीची एसएलएमजी नामक कंपनी आहे. ही कंपनी देशभरातील कोकाकोला कंपनीचे बॉटलिंगचे काम करते. म्हणजे या कंपनीचाही सौर ऊर्जेशी सूतराम संबंध नाही. याशिवाय आणखी एक री एनर्जी नामक कंपनी आहे. या कंपनीचे प्रमुख कुशाग्र म्हणून कुणीतरी आहेत. ही कंपनी गत अनेक वर्षांपासून सौर ऊर्जेचे उत्पादन करते. त्यामुळे त्यांना या क्षेत्रातील अनुभव आहे. या कंपनीचे मुख्यालय उत्तर प्रदेशाच्या नोएडात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वरुण कराड यांच्या कंपनीचे हेडऑफिसही नोएडातच आहे. या दोन्ही कंपन्यांचा पत्ता जवळपास एकच आहे. अशा या नवख्या कंपनीला 4700 कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे, ते केवळ भागवत कराड यांचे सुपुत्र आहेत म्हणून. त्यांच्या जागी इतर कुणाची अशी नवी कंपनी असती व तिचे भागभांडवल 50 लाख रुपये असते, तरी त्यांना हे कंत्राट मिळाले नसते. पण भागवत कराड केंद्रात असताना वीज निर्मितीशी संबंधित विविध समित्यांवर होते. त्यांनी दबाव टाकून किंवा आपल्या संबंधांद्वारे त्यांनी आपल्या मुलाला हे कंत्राट मिळवून दिले असेल, असा आरोप जयश्री खाडिलकर यांनी केला आहे. 6 गिगावॉट सौरपटलाचे उद्दिष्ट जायकवाडी धरणाच्या क्षेत्रातील या तरंगत्या सौर पटलामुळे 2032 पर्यंत 60 गिगावॅट स्वच्छ वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. देशभरात सौर ऊर्जाप्रकल्पांना गती दिली जात असताना त्यासाठी लागणार्या सौरपटलाच्या निर्मितीमध्ये एलएनके ही कंपनी महाराष्ट्रातून गुंतवणुकीत उतरली आहे. या कंपनीकडून 6 गिगावॅट सौरपटल बनविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आल्याची माहिती दावोसमधील करारानंतर देण्यात आली होती. काय म्हणाले होते भागवत कराड? भागवत कराड या कराराचे समर्थन करताना म्हणाले होते की, हा प्रकल्प गुजरातला चालला होता. माझा मुलगा यात भागीदार आहे. पण त्यांच्या गुंतवणुकीमुळे एक मोठा प्रकल्प महाराष्ट्रास मिळाला. या गुंतवणुकीमुळे सौरपटलनिर्मितीला चालना मिळणार आहे.
भागवत कराड यांच्यावर गंभीर आरोप:मुलाच्या अवघ्या एक वर्ष जुन्या कंपनीला तब्बल 4 हजार 700 कोटींचे कंत्राट मिळून दिल्याचा ठपका
