![]()
पुण्यात काँग्रेस भवन परिसरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर काँग्रेस पक्षाने पोलीस आयुक्तालयावर आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली. काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात आली. यावेळी पोलिसांनी जाणूनबुजून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. तसेच, कालच्या आंदोलनात महापौर मंजुषा नागपुरे यांनी चिथावणीखोर भाषण केले असतानाही त्यांच्याविरोधात गुन्हा का दाखल झाला नाही, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांनी वेळ लावल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. पुणे पोलिसांच्या भूमिकेविरोधात काँग्रेस उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले की, काँग्रेस पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या बदलीची मागणी करणार आहे. हा मोर्चा लवकरच पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत. शिंदे यांच्या मते, भाजपाच्या भूमिकेबाबत पोलिसांची भूमिका पाठिंब्याची आहे, त्यामुळे आंदोलन करणे आवश्यक आहे. काँग्रेसने नोंदवलेल्या तक्रारीतील दोन नावे वगळण्यात आली आहेत. भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी चिथावणीखोर भाषणे केली आणि त्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक झाली, असा आरोप शिंदे यांनी केला. या घटनेबाबत प्रशांत जगताप म्हणाले की, काँग्रेस भवन परिसरातील घटना दुर्दैवी असून, त्यातून भाजप राजकीय दहशतवाद माजवत असल्याचे दिसते. पुणे पोलिसांनी पक्षपातीपणा केला आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना का अडवले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्य रस्ता दोन तास अडवल्याने आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. जगताप यांनी सांगितले की, त्यांना मिळालेल्या एफआयआर कॉपीमधून महापौरांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे आंदोलनाला हिंसक वळण मिळाले होते. महापौरांचे नाव वगळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दबाव टाकला का, असा प्रश्नही जगताप यांनी विचारला. मुंबई उच्च न्यायालयात सर्व पुरावे घेऊन दाद मागणार असून, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही ते म्हणाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मंजुषा नागपुरे आंदोलनात उपस्थित असल्याचे दिसत आहे, असेही जगताप यांनी नमूद केले.
काँग्रेसचा पोलीस आयुक्तालयावर आक्रोश मोर्चा:पोलिसांवर आंदोलन चिघळवल्याचा गंभीर आरोप, आयुक्तांच्या बदलीची मागणी
