![]()
चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या गट नोंदणीवरून निर्माण झालेला वाद आता नागपूर विभागीय आयुक्तांच्या पातळीवरून थेट शासनाच्या दारात पोहोचला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार या दोन गटांमध्ये विभागलेल्या नगरसेवकांच्या नोंदणीप्रकरणी मोठा पेच निर्माण झाला आहे. 23 जानेवारी रोजी धानोरकर गटातील 13 नगरसेवकांनी नागपूर विभागीय आयुक्तांसमोर स्वतंत्र गट नोंदवला. त्याच दिवशी वडेट्टीवार गटातील नगरसेवकांनी या नोंदणीवर आक्षेप घेत काँग्रेसची एकत्रित गट नोंदणी व्हावी, अशी मागणी केली. या आक्षेपानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रकरण शासनाकडे पाठवून नियमानुसार निर्णय घ्यावा, अशी शिफारस केल्याची माहिती आहे. दरम्यान, 10 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर महापौर पदाची निवडणूक होणार असल्याने हा वाद अधिकच महत्त्वाचा ठरला आहे. जर तोवर शासनदरबारी निर्णय झाला नाही, तर गट नोंदणी न झालेल्या काँग्रेस नगरसेवकांना मतदानाचा अधिकार मिळेल की नाही, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. 10 फेब्रुवारीपर्यंत हा वाद न सुटल्यास वडेट्टीवार गटातील ज्या नगरसेवकांची नोंदणी प्रलंबित आहे, त्यांना महापौर निवड प्रक्रियेत मतदान करण्यासाठी विभागीय आयुक्तांसमोर विशेष शपथपत्र सादर करावे लागू शकते. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया आणि तिची वैधता याबाबतही नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढला आहे. त्यामुळे या संदर्भातील बैठक आता दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या समोर होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरवाजांवर नोटीस चिटकवली दुसरीकडे, या वादाला विचित्र वळण मिळाले आहे. वडेट्टीवार गटाचे नगरसेवक राजेश अडूर यांनी सर्व 27 काँग्रेस नगरसेवकांची बैठक स्वतःच्या घरी बोलावली. मात्र, धानोरकर गटाच्या नगरसेवकांना नोटीस प्रत्यक्ष देण्याऐवजी त्यांच्या घरांच्या दरवाजांवर ती चिटकवण्यात आली. यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एखाद्याच्या घरावर नोटीस चिटकवणे हे अवमानकारक मानले जाते, अशी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसमधील गटबाजी टोकाला नोटीसच्या वेळेबाबतही गोंधळ निर्माण झाला. नोटीसमध्ये बैठक रविवारी दुपारी 12 वाजता असल्याचे नमूद केले गेले. मात्र, धानोरकर गटाचे नगरसेवक राहुल घोटेकर यांच्या घरावर ही नोटीस रविवारी दुपारी 2 वाजता लावण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या कृतीतून काँग्रेसमधील गटबाजी किती टोकाला पोहोचली आहे, हे स्पष्ट होत आहे. 66 पैकी भाजप 23, काँग्रेसचे 27 नगरसेवक सध्या काँग्रेसचे 27 नगरसेवक दोन गटात विभागले गेले आहेत. वडेट्टीवार गटाकडे 20, तर धानोरकर गटाकडे 7 नगरसेवक असल्याची माहिती आहे. या दोन्ही गटांमधील संघर्ष उघडपणे दिसू लागला आहे. पक्षाच्या अंतर्गत बैठकीसाठी नोटीस घरावर चिटकवणे कितपत योग्य, यावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. चंद्रपूर महापालिकेतील एकूण संख्याबळही या वादाला महत्त्व देते. 66 नगरसेवकांपैकी भाजप 23, काँग्रेस 27, काँग्रेस समर्थित जनविकास सेना 3, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) 6, वंचित 2, बसपा 1, शिवसेना (शिंदे गट) 1, अपक्ष 2 आणि एमआयएम 1 अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील गटबाजीचा थेट परिणाम महापौर निवडणुकीच्या निकालावर होण्याची शक्यता आहे. आता शासनदरबारी या वादावर काय निर्णय होतो, आणि 10 फेब्रुवारीपूर्वी चित्र स्पष्ट होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार, काँग्रेसमधील संघर्ष उघड्यावर:नगरसेवकांच्या दरवाजांवर नोटीस; दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या समोर बैठक
