पुण्यात 'लेन्सकेप केरळ' छायाचित्र प्रदर्शन:दहा नामवंत छायाचित्रकारांच्या 100 निवडक कलाकृतींचा संग्रह सादर




पुण्यात ‘केरळ टुरिझम’तर्फे ‘लेन्सकेप केरळ’ या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात दहा नामवंत छायाचित्रकारांनी संपूर्ण केरळमध्ये टिपलेल्या १०० निवडक छायाचित्रांचा संग्रह सादर केला जाणार आहे. या प्रदर्शनात केरळमधील लोकांचे वैविध्यपूर्ण जीवन, समृद्ध संस्कृती, निसर्गसौंदर्य, वन्यजीव आणि दैनंदिन जीवनातील क्षण अशा विविध पैलूंना स्थान देण्यात आले आहे. दहा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून साकारलेले हे प्रदर्शन ‘गॉड्स ओन कंट्री’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळचे एक चैतन्यमय आणि आधुनिक रूप प्रेक्षकांसमोर उभे करते. हे प्रदर्शन १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत राजा रवि वर्मा गॅलरी, आर्ट टुडे स्टुडिओ, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे येथे खुले राहील. या प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी, एक विशेष ‘फोटोग्राफी मास्टरक्लास’ आयोजित करण्यात आला आहे. दुपारी २ ते ४ या वेळेत होणाऱ्या या मास्टरक्लासमध्ये प्रसिद्ध छायाचित्रकार सौरभ आनंद चॅटर्जी आणि बालन माधवन मार्गदर्शन करतील. या सत्रासाठीही प्रवेश विनामूल्य आहे. या प्रदर्शनाचे क्युरेशन प्रसिद्ध कला समीक्षक उमा नायर यांनी केले असून, पुरस्कार विजेते छायाचित्रकार बालन माधवन यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. एच. सतीश, शिवांग मेहता, अमित पसरिचा, सौरभ आनंद चॅटर्जी, सैबल दास, उमेश गोगना, मनोज अरोरा, ऐश्वर्या श्रीधर, नताशा कर्तार हेमराजानी आणि कौनतेय सिन्हा यांसारख्या दिग्गज छायाचित्रकारांच्या कलाकृती या प्रदर्शनात पाहायला मिळतील. नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन संपूर्ण केरळमधील विविध घडामोडींची चित्रे पाहावीत असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks